पालकमंत्री, महापौरांच्या उपस्थितीत आयुक्तांचे आदेश
अतिक्रमण आणि घाणीचे साम्राज्य असलेल्या रुपादेवी पाडा मैदानाची पुरती दुरवस्था झाली आहे. हे थांबवण्यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या भागाची भेट घेऊन तेथील पाहणी केली. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. आयुक्तांनी रुपादेवी मैदान आणि रायलादेवी तलावास भेट देऊन या दोन्ही ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रुपादेवी पाडा मैदान आणि रायलादेवी तलाव कात टाकणार आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रुपादेवी पाडा मैदानाला चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधणे, आकर्षक लँडस्केपिंग करणे, खुला रंगमंच बांधणे, नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे, खेळण्यांची व्यवस्था करणे आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तसेच यावेळी त्यांनी रायलादेवी तलावाची पाहणी केली. प्रदूषणाने ग्रासलेल्या तलावातील जलपर्णी काढून तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. याचवेळी पूर्व द्रुतगती मार्गावर तीन हात नाका ते लुईसवाडी या दरम्यान हरित जनपथ तयार करणे, विश्रांती कक्ष आणि प्रसाधनगृह उभारणे याबाबतही पालकमंत्री यांनी आयुक्तांना सुचवले.
आयुक्तांनी महापालिका यंत्रणेला व संबंधितांना सूचना दिली. त्यानंतर त्यांनी लुईसवाडी येथील शाळेला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी शाळेची संरक्षक भिंत बांधणे आणि रंगरंगोटीसह इतर कामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल उपस्थित होते.