कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा हल्लाबोल

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी अलीकडेच रुजू झालेले पी. वेलरासू हे भाजप नगरसेवकांचीच कामे करतात, असा गंभीर आरोप करत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी आयुक्त कार्यालयात धुडगूस घातला. आयुक्तांच्या समक्ष खुर्च्याची आदळआपट करत ‘आयुक्त परत जा’च्या घोषणा करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी बराच वेळ गोंधळ घातला. विशेष म्हणजे, एरवी महापालिका अधिकाऱ्यांची बाजू घेणारे महापौर राजेंद्र देवळेकर सेनेच्या नगरसेवकांच्या घोळक्यात सहभागी झाले होते.

ई.रवींद्रन यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी रुजू झालेले पी. वेलारसू यांनी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज चालविले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे अनावश्यक कामांवर आयुक्तांनी बंधने आणली आहेत. त्यामुळे गटार, पायवाटांच्या कामांमध्ये दंग झालेल्या नगरसेवकांची अडचण झाली असून त्यापैकी काहींच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्याची चर्चा आहे. आयुक्तांनी आखून दिलेली ही ‘आर्थिक शिस्त’ फारशी परवडणारी नाही हे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी आयुक्त वेलरासू यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी महिला नगरसेविका सर्वाधिक आक्रमक झाल्या होत्या. यावेळी सेनेचे सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

महापालिकेतील सत्तेत भाजप भागीदार असला तरी नवे आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात, असा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आक्षेप आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनावर धडक देत असताना शिवसेना नगरसेवकांनी भाजप नगरसेवकांच्या नावाने खडे फोडल्याचे दिसून आले. दोन वर्षे उलटली तरी प्रशासनाकडून ठोस विकासकामे मंजूर केली जात नाहीत. पाणीटंचाई, कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. २७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या विषयांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन केराची टोपली दाखवितात. नागरी समस्यांवर महापौर, पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. पण ते बोटचेपेपणाची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांची पाठराखण करतात. त्यामुळे हे अधिकारी खूप शेफारले आहेत, अशी टीका करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावेळी स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांवरही राग काढला.

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावरून नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असताना सत्ताधारी शिवसेनेला विकासकामे मार्गी लावून घेण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने सेनेचा प्रशासनावरील वचक संपला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

पाणीप्रश्न, २७ गावांमधील महत्त्वाच्या मंजूर नस्ती प्रलंबित आहेत. माजी आयुक्तांनी काही नस्ती मंजूर केल्या आहेत. या नस्ती आयुक्तांच्या दालनात आहेत असे उत्तर काही अधिकारी नगरसेविकांना सतत देत होते. दहा वेळा फे ऱ्या मारूनही अधिकारी काम करीत नसल्याने सेनेच्या नगरसेविका संतप्त झाल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करूनही हा विषय मार्गी लागत नसल्याने नगरसेविकांच्या संतापाचा मंगळवारी उद्रेक झाला.

– प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना

पाणीपुरवठा तसेच नगरसेवक निधीतील कामे तसेच इतर ज्या महत्त्वाच्या नस्ती आपल्याकडे आहेत त्या तपासून तातडीने मार्गी लावल्या जातील. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहून पावले उचलली जात आहेत. ठरावीक हेतू ठेवून कुणाचेही काम अडविले जात नाही. आढावा घेऊन कामे मार्गी लावली जात आहेत. सगळ्यांनी सहकार्य करावे आणि त्यातून आपण पुढे जाऊ.

– पी. वेलरासू, आयुक्त