डोंबिवलीतील पक्षांच्या कार्यालयासमोर कार्यकत्यांची वर्दळ

महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून शिवसेनेचे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील मध्यवर्ती कार्यालय शिवसेना पदाधिकारी, नेत्यांनी गजबजून गेले आहे. या नेत्या, पदाधिकाऱ्यांची वाहने शाखेसमोर रस्त्याच्या कोपऱ्याला उभी करून ठेवण्यात येत असल्याने संध्याकाळच्या वेळेत शिवसेना शाखेसमोर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

शिवाजी पुतळ्याच्या बाजूला असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर रस्त्यावर शिव वडापावची गाडी आहे. त्याच्या बाजूला १५ दुचाकी नियमित भररस्त्यात उभ्या करून ठेवलेल्या असतात. या दुचाकी, वडापाव गाडीच्या अवतीभवती नागरिक वडापाव खात उभे असतात. वडापाव खाण्यासाठी आलेले तरुण, त्यांची वाहनेही रस्त्याच्या कोपऱ्याला उभी करून ठेवली जातात. या भागातील सृष्टी, मेनका या साडय़ांच्या दुकानासमोर लोढा हेवन भागात जाण्यासाठी आठ ते नऊ ओमनी वाहने नियमबाह्य़ रस्त्यावर उभी केली जातात.

संध्याकाळी पाचनंतर शिवसेनेचे पदाधिकारी, नेत्यांची वाहने वडापावची गाडी, दुचाकी यांच्या गराडय़ात उभ्या राहतात. त्यामुळे या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सायंकाळी सातनंतर चाकरमानी आपल्या दुचाकी, रिक्षेने घरी जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळी शाखेसमोर उभ्या असलेल्या नेत्यांच्या वाहनांमुळे केडीएमटीची बस, खासगी बसना वळण घेताना अडचण निर्माण होते.

त्यामुळे वाहने इंदिरा चौकापर्यंत अडकून पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा त्रास सुरू असल्याने काही जागरूक नागरिकांनी वाहतूक विभागाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांनी आपली वाहने पी. पी. चेंबर्स मॉलमधील वाहनतळावर ठेवावीत अशी नागरिकांची मागणी आहे. निवडणूक होईपर्यंत हा त्रास आम्ही का सहन करायचा, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उमेदवार मुलाखती कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वाहतूक पोलीस तैनात

इंदिरा चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तेथे वाहतूक पोलीस,सेवक तैनात करण्यात आले आहेत. या चौक परिसरात फेरीवाले बसतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. फेरीवाले रस्त्यावर बसले की वाहने आणखी रस्त्याच्या दिशेने उभी केली जातात. शाखेसमोरील वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर याबाबत आजच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक नगराळे यांनी दिली.