मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा आरोप; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करणाऱ्या रिलान्स वीज कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवीगाळ करून त्यांचे अपहरण केल्याचा आरोप शिवसेनेच्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनकडून करण्यात आला आहे. मेहता यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वीज कंपनीच्या उत्तर क्षेत्र विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. बेकायदा सुरू असलेल्या कामाला अटकाव केल्याने त्याचे राजकीय भांडवल केले जात असल्याचे मेहता यांचे म्हणणे आहे.

भाईंदर पूर्व येथील खारीगावातील सागर ही धोकादायक इमारत जानेवारी महिन्यात पाडण्याचे काम सुरू असताना तिचा काही भाग शेजारीच असलेल्या रिलायन्स वीज कंपनीच्या उपकेंद्रावर पडला. त्यामुळे उपकेंद्राला आग लागली, तसेच तेथील केबलही तुटल्या. उपकेंद्राचे दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम अधिकृतरीत्या सुरू असताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांनी वीज कंपनीचे अधिकारी विक्रमसिंह जाधव, त्यांचे साहाय्यक यू. डी. पाटील तसेच कामगार दिलीप कोळे यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे, असा आरोप मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने केला आहे. रविवारी भाजप आमदार नरेंद्र मेहता हे काम सुरू असलेल्या ठिकाणी आले आणि त्यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि नंतर पोलीस ठाण्यात घेऊन गेले, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली. याचा निषेध करण्यासाठी आज वीज कंपनीच्या उत्तर विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी भाईंदर पूर्व येथील नवघर पोलीस ठाणे तसेच मीरा-भाईंदर महापालिकेवर मोर्चा काढला. आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली तसेच महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी कामगारांच्या शिष्टमंडळाने आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन पुढे सुरू ठेवण्यात येईल, असे विठ्ठलराव गायकवाड यांनी सागितले.

‘आरोप चुकीचे’

आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वीज कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदून ठेवला होता. त्यामुळे गेला महिनाभर हा रस्ता रहदारीसाठी बंद होता. लोकप्रतिनिधी आणि एक करदाता नागरिक या नात्याने बेकायदा काम करणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. वीज कंपनीने लगेचच दुसऱ्या दिवशी महापालिकेत १६ लाख रुपयांचा भरणा केला यावरून सुरू असलेले काम बेकायदा होते हे सिद्ध होते. कर्मचारी युनियन शिवसेनेची असल्याने राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत आहेत, असा खुलासा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.