अंबरनाथ येथील शिवमंदिर आणि डोंबिवलीतील पिंपळेश्वर शिवमंदिराप्रमाणेच शिळफाटय़ालगत असलेल्या खिडकाळी येथील शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. महाशिवरात्रीला दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात; मात्र त्यांच्यासाठी मंदिराच्या ठिकाणी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.  
ठाणे जिल्ह्य़ातील प्राचीन शिवमंदिरांमध्ये अंबरनाथच्या मंदिरापाठोपाठ लोनाड आणि खिडकाळी येथील शिवमंदिरांचा उल्लेख केला जातो. खिडकाळी येथील शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येथे येतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येथे वास्तव्यास येतात. सद्गुरू स्वामी शिवानंद महाराज यांनी १९३४ मध्ये येथे समाधी घेतली. १९८८ पर्यंत साधू या मंदिराची देखभाल करत होते. त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टची स्थापना केली.
२००० मध्ये हे मंदिर विश्वस्त मंडळाच्या ताब्यात आले. तेव्हापासून ट्रस्टच या मंदिराची देखभाल करीत आहे. ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी येथे धर्मशाळा, विश्रामगृह बांधले आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून पर्यटकही या स्थळाला भेटी देतात. येथे सात ते आठ फूट खोलीचा तलाव असून गणेशोत्सवाच्या दरम्यान येथे भाविक गणेश विसर्जन करतात. तसेच इतर धार्मिक विधीही येथे केले जातात. यामुळे या मंदिराचा परिसर सतत भाविकांनी गजबजलेला असतो.
खिडकाळेश्वर मंदिर हे ठाणे महापालिकेच्या हद्दीत येते. मात्र ठाणे शहरापासून हे मंदिर दूर असल्याने पालिकेचे इथे लक्ष नाही. खिडकाळेश्वर मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळेश्वर मंदिरास गेल्या वर्षी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला.
तसेच अंबरनाथ येथील मंदिरासही तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आता प्रयत्न होत आहेत. गेल्याच आठवडय़ात अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल मोठय़ा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र खिडकाळेश्वर मंदिराकडे ना ठाणे महापालिका, लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना पुरातत्त्व खात्याचे. पुरातन मंदिर असूनही या मंदिराच्या इतिहासाची नोंद कोठेही नाही.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली

ट्रस्टकडे दरवर्षी ७ ते ८ लाखांचा निधी देणगी जमा होते. त्यातूनच मंदिराची देखभाल दुरुस्ती आणि भाविकांसाठी सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. दत्तजयंती आणि महाशिवरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होतात. मंदिराच्या खडकांची अनेक ठिकाणी झीज झाली आहे. काही ठिकाणी तडे गेले आहेत. पुरातन श्रद्धास्थान असल्याने भाविकांना निवासस्थान, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि पार्किंगची व्यवस्था व्हायला हवी. त्यासाठी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
 – वसंत घरत, ट्रस्टचे अध्यक्ष