29 September 2020

News Flash

सण, उत्सवांशी संबंधित दुकानांना सूट द्या!

राखी, मिठाई आणि पुजेच्या साहित्यांची घाऊक दुकाने दररोज सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी आता उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

मिठाईची दुकाने एक दिवसाआड बंद राहिल्यास मालही खराब होऊ शकतो.

मिठाई, राखी, पूजासाहित्यांच्या दुकानदारांची मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये टाळेबंदी कायम ठेवत शहरातील इतर बाजारपेठा सम विषम पद्धतीने गुरूवारपासून सुरू झाल्या. मात्र, सम-विषम धोरण आणि तोंडावर आलेले सणामुळे होणारी गर्दी आणि नुकसान टाळण्यासाठी राखी, मिठाई आणि पुजेच्या साहित्यांची घाऊक दुकाने दररोज सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी आता उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. श्रावण महिना, रक्षाबंधन, ईद, गणेशोत्सवासारखे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्राहकांना खरेदीसाठी खुप कमी दिवस मिळतात, त्यामुळे गर्दी कमी होण्याऐवजी वाढेल अशी भीतीही व्यापाऱ्यांना आहे.

जिल्ह्य़ातील किरकोळ आणि राज्यातील एक मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून परिचीत असलेली उल्हासनगर शहरातली बाजारपेठ गुरूवारपासून पुन्हा सुरू झाली. पहिल्या दिवशी प्रभाग अधिकाऱ्यांनी निश्चित केल्यानुसार सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी सण, उत्सवात लागणाऱ्या साहित्य विक्री करणाऱ्या कॅम्प दोन भागातील बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांकडून सामाजिक अंतर ठेवण्याचे आणि मुखपट्टी लावण्याचे आवाहन ग्राहकांना केले जात होते. २० दिवसांनंतर सुरू झालेल्या बाजारपेठांमुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. श्रावण महिना, रक्षाबंधन, गणेशोत्सव अशा सणांसाठी किरकोळ व्यापारी घाऊक दुकानांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यात एक दिवसाआड दुकाने सुरू राहिल्यास दुकानात गर्दी अधिक वाढू शकते. त्याचसोबत मिठाई आणि नाशवंत पदार्थानाही या काळात मोठी मागणी असते. अशावेळी मिठाईची दुकाने एक दिवसाआड बंद राहिल्यास मालही खराब होऊ शकतो. त्यामुळे सण उत्सवांच्या काळातील साहित्याची, मिठाईची दुकाने दररोज सुरू ठेवण्याची मागणी आता उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. दररोज दुकाने खुली राहिल्यास गर्दीचे प्रमाणही कमी होईल असाही दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.

शहराच्या निर्यातीला फटका

उल्हासनगर शहरातून देशातील विविध राज्यांमध्ये राख्या, स्वस्तातील भेटवस्तू, चॉकलेट, मुस्लिम बांधव परिधान करणारे कपडे मोठय़ा प्रमाणावर निर्यात केले जातात. ऐन सणांच्या तोंडावर दुकाने सुरू झाली असली तरी हे साहित्य यंदा देशातल्या इतर राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये नेता आले नाही. त्यामुळे कोटय़ावधींचे नुकसान झाल्याचे उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिपक छतलानी यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 3:28 am

Web Title: shopes selling festival items allow to keep open every day dd70
Next Stories
1 कल्याण, डोंबिवलीत दुकानांत झुंबड
2 दुकाने उघडण्याआधी करोना चाचणीची सक्ती
3 अनधिकृत शाळांची यादी रखडली
Just Now!
X