tvlog01यंदाच्या उन्हाळ्याने मार्चच्या मध्यापासूनच नागरिकांना चटके द्यायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या झळांनी होरपळून निघणाऱ्या शरीराला जशी एसीची थंड हवा सुखावते, तशी उकाडय़ाने कासावीस झालेल्या घशाला थंड पेये किंवा आइस्क्रीमची चव थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येक  शहरातील छोटे-मोठे शीतपेयांचे, शीत पदार्थाचे अड्डे खवय्यांनी गजबजू लागतात. जिवाचे पाणी पाणी करणाऱ्या उन्हाळ्यात वाटसरूंना दिलासा देणारी तर कॉलेजकुमारांना धुडगूस घालण्यासाठी कल्याणमधील हक्काची खाद्यजागा म्हणजे श्री स्वामी समर्थ कोल्ड्रिंक्स.
दुधावरची साय ही बहुतेक खवय्यांचा वीकपॉइण्ट. दुधावरच्या या मलईला थंडगार बर्फाची साथ मिळाली तर ती खवय्यांसाठी पर्वणीच ठरते. कल्याण येथील रामबाग परिसरातील श्री स्वामी समर्थ कोल्ड्रिंक्स येथील मलई आणि बर्फाच्या युतीचा ‘मलई गोळा’ खायला संपूर्ण शहरातील शौकीन येतात. पारंपरिक पद्धतीने हातगाडीवर दोन, पाच रुपयामध्ये मिळणाऱ्या बर्फाच्या गोळ्याचे हे बदललेले स्वरूप आहे. रामबाग परिसरात असणाऱ्या या खाद्यजागेत अवघ्या २५ रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत मलई गोळा उपलब्ध आहे. किमतीनुसार मलई गोळ्याची खासियतही बदलत जाते. २५ रुपयात मिळणाऱ्या मलाई गोळ्यात मलई, ड्रायफ्रुट यांच्या मिश्रणासह खवय्याच्या पसंतीनुसार उपलब्ध असलेल्या चॉकलेट, मँगो, रोझ, बटरस्कॉच, ब्लू बेरी, स्ट्रॉबेरी, केशर पिस्ता यांपैकी एका आवडीच्या फ्लेवरची भर घालण्यात येते तर ३५ रुपयांत मिळणाऱ्या मलाई गोळ्यात उपरोक्त सर्व जिन्नसांबरोबरच खास मिल्क मेड आणि जिभेला वेगळी चव देणारे चॉकलेट चीप्स टाकण्यात येतात. ४५ रुपयांमध्ये मिळणाऱ्या मलाई गोळ्यात आइस्क्रीमचा एक चविष्ट गोळा, तर ६० रुपयांच्या मलाई गोळ्यात आईस्क्रीमचे दोन गोळे घालण्यात येतात. ७५ रुपयांच्या आकर्षक आणि आकाराने मोठय़ा असलेल्या मलाई गोळ्यात खास राजेंद्र प्रधान यांनी बनवलेले ‘विब क्रीम’ तर गोळ्याची चव पालटून टाकणारे नेस्लेचे स्पेशल ‘मिल्क मेड’ घालण्यात येते. अशा विविध किमतीत व आकारात उपलब्ध असलेला मलाई गोळा मटकावण्यासाठी दुकानात विविध वयोगटांतील खवय्यांची दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत झुंबड उडते.  राजेंद्र प्रधान यांच्या दुकानात मलाई गोळ्याबरोबरच ‘आइस भेळ’ हा अनोखा पदार्थ मिळतो. तिखट चटणी, गोड चटणी, जाड व बारीक फरसाण, सफरचंद, डाळिंबाचे काप यांच्या मिश्रणातून तयार झालेली आणि बर्फाच्या चुऱ्यात न्हालेली अशी ही ‘आइस भेळ’. याव्यतिरिक्त दुकानात मिल्क शेक, सरबत, फालुदा, पारंपरिक पद्धतीचा बर्फाचा गोळा यांचीही रेलचेल असते.

हातगाडी ते दुकान प्रवास
राजेंद्र प्रधान यांनी २००० मध्ये म्हणजे १५ वर्षांपूर्वी रामबाग परिसरातील गुरुद्वारासमोर एका हातगाडीवर आपल्या या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला गोळा, सरबत एवढय़ापुरतीच हा व्यवसाय मर्यादित होता. व्यवसायाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मिल्क शेक, फालुदा असे विविध प्रकार हातगाडीवर सुरू करण्यात आले. रामबाग परिसरात चार वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजेंद्र यांनी आपल्या हातगाडीवर असलेल्या व्यवसायाचे रूपांतर एका दुकानात केले.

श्री स्वामी समर्थ कोल्ड्रिंक्स
स्थळ –  रामबाग लेन नं. ४, गुरू नानक शाळेजवळ, गाळा नं. ४, गणेश आशीष सहकारी गृहनिर्माण संस्था, कल्याण (प.)
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९
समीर पाटणकर