४०० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त शहरे

गेली ३० वर्षे टिकून असलेले गावपण आता सरण्याच्या मार्गावर आहे. नागरी सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या २७ गावांच्या पंचक्रोशीत स्मार्ट सिटी वसविण्याचे नियोजन कल्याण डोंबिवली महापालिकेने केले आहे. नगररचना विभागाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार मौजे दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली आणि हेदुटणे या गावांच्या हद्दीत असलेल्या ४०० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सोयीसुविधांचे शहर वसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका नियंत्रक असलेल्या २७ गावांच्या हद्दीत ७६० हेक्टर जमीन विकासासाठी मोकळी आहे. या जमिनींवर ‘एमएमआरडीए’च्या विकास आराखडय़ातील आरक्षणे, सरकारी, वन जमीन, सागरी किनारा नियमन क्षेत्र, झालर पट्टी (बफर झोन) असे भौगोलिक क्षेत्र आहे. संघर्ष समितीच्या रेटय़ाने २७ गावे पालिकेतून शासनाने जुलै २००२ मध्ये वगळल्यानंतर २७ गावांचे नियंत्रक म्हणून सुरुवातीला जिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषद यांनी काम पाहिले. ऑगस्ट २००६ पासून ‘एमएमआरडीए’कडे २७ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी आली.

मागील २० वर्षांत २७ गावांना कायमस्वरूपी नियंत्रक नसल्याने या गावांचे पालकत्व स्वीकारलेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने नेहमीच गावे पालिकेतून वगळा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे या गावांमध्ये विकास कामे झाली नाहीत. कल्याण शिळफाटा महामार्गालगत असलेली आणि कल्याण डोंबिवली शहरांच्या उंबरठय़ावर असलेली ही गावे आज नागरी सुविधा नसल्याने रस्ते, पाणी, नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. सक्षम राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि खमकी प्रशासकीय यंत्रणा गावांमध्ये नसल्याने त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेऊन २७ गावांमध्ये बेसुमार बेकायदा बांधकामे केली आहेत. आरक्षित, सरकारी जमिनींवर बेकायदा इमारती, चाळी उभारल्या आहेत. सरकारी महसूल, पालिकेचा कर चुकवून सुमारे पाच हजारांहून अधिक इमारती उभारल्या आहेत.

नवे विकास धोरण

आठ गावांच्या हद्दीत ‘एमएमआरडीए’चे विकास केंद्र आकाराला येत आहे. अशा परिस्थितीत गावे दलदलीत ठेवणे योग्य नसल्याने कल्याण डोंबिवली पालिकेने २७ गावांमधील पाच गावांच्या हद्दीत सुंदर नगरीच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त नगर वसविण्याचा आराखडा तयार केला आहे. शिळफाटा ते बदलापूर पाइपलाइन रोड या दरम्यान हे नगर आकाराला येणार आहे. या नगरीत उंबार्ली हे कावळ्यांच्या निवासाचे गाव आहे. दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली, हेदुटणे ही २७ गावे मध्यवर्ती ठिकाणी आहेत. माहिती तंत्रज्ञान संकुल, कौशल्य विकास केंद्र, रोजगाराच्या संधी देणारी केंद्र, समाज विकास केंद्र, उद्यान, बगीचा विकास, वाहनतळ, वाहतूक हबसारखे प्रकल्प या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या कामासाठी तज्ज्ञ वास्तुशिल्पकार, तंत्रज्ञ, अभियंते नियुक्त करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू आहेत.