अर्जुननगर म्हणजे एक गाव आणि गावातील सगळी घरे म्हणजे एक कुटुंब. जसे गावात असते, तसे खेळीमेळीचे वातावरण या ठिकाणी पाहण्यास मिळते. घरात ज्येष्ठ नागरिक, वृद्ध मंडळी असतील, पती-पत्नी नोकरी करीत असतील, तर मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात देऊन, शेजाऱ्यांना फक्त सूचना करून निर्धास्तपणे दाम्पत्य नोकरीला निघून जातात. सोसायटीतील प्रत्येक सदस्याचा एकमेकावर असलेला विश्वास आणि प्रवेशद्वारावर असलेला विश्वासू सुरक्षारक्षक हे सोसायटीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.

प्रवेशद्वारावरील सुरक्षा दालनाकडे न पाहता, सोसायटीच्या आवारात प्रवेश केला की हळूच पाठीमागून शुक शुक असा आवाज येण्यास सुरुवात होते. पाठीमागे वळून पाहिलात तर सोसायटीचा सुरक्षारक्षक असतो. त्याच्याकडे काय पाहायचे, म्हणून आपण पुढे चालू लागलो तर सुरक्षारक्षक आणखी वेगाने चालून आपल्या पुढेच येऊन उभा ठाकतो. मग तुम्ही कितीही महत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) असोत, सुरक्षारक्षकाला तुम्हाला कोणाच्या घरी जायचे आहे, काय काम आहे, हे सांगितल्याशिवाय तुम्हाला इमारतीच्या कोणत्याही भागात जाण्याची मुभा सुरक्षारक्षक देत नाही. डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्थानकापासून सात ते आठ मिनिटांच्या अंतरावरील अर्जुननगरमध्ये इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. पाथर्ली नाक्यावरून उजव्या बाजूने वळण घेतले की कोपऱ्यावर अर्जुननगर ही वसाहत आहे. सोसायटीत प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावरील उतारावरूनच सोसायटीचे भव्य चौकोनी मैदान पाहून आनंदमिश्रित आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही. कारण डोंबिवलीत अशी विस्तीर्ण मैदाने असलेली गृहसंकुले अतिशय कमी आहेत. शिस्तप्रिय, आटोपशीर चौकटीत बांधकाम व्यवसाय करणारे दिनकर म्हात्रे यांनी या संकुलाची उभारणी केली आहे. तीच शिस्त पुढे सोसायटीतील सदस्यांनी सुरू ठेवल्याचे पाहण्यास मिळते. पूर्वीच्या डोंबिवली शहराच्या वेशीवरचा हा भाग आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे हा परिसर आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला आहे.

१९९६-९७ मध्ये या संकुलाची उभारणी पूर्ण झाली. तीन माळ्यांच्या पाच इमारती ३ हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभ्या आहेत. १ हजार चौरस मीटर क्षेत्रावर इमारतींचे बांधकाम आहे. उर्वरित २ हजार चौरस मीटर भौगोलिक क्षेत्र मोकळे आहे. आताच्या बांधकाम फुटाच्या दरात या सोसायटीचा पुनर्विकास केला तर किती वाढीव चटई क्षेत्र बांधकामासाठी मिळेल, ही गणिते करीत अनेक विकासकांचा सोसायटीवर डोळा आहे. मात्र सोसायटी सदस्यांच्या मनात अद्याप पुनर्विकास हा विचार शिवलेला नाही.

शहराच्या एका बाजूला, आजूबाजूला झोपडपट्टी येथे कसे काय राहायचे, असे प्रश्न सुरुवातीला येथे राहायला येणाऱ्या प्रत्येक कुटुबीयांच्या मनात होते. पण वाजवी दरात त्या वेळी सदनिका मिळत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य, अनेक वर्षांपासूनची पुंजी सांभाळून असलेल्या शहरातील मंडळींनी या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या. या संकुलात एकूण ७५ सदनिका आहेत. बहुतेक जण कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. काही मंडळी आपली जुनी सदनिका विक्रीला काढून तर, काही चाळींमधून या ठिकाणी राहण्यास आली आहेत. सर्व समाजांतील कुटुंबीय या ठिकाणी राहतात. सर्वाधिक रहिवासी हे मराठी आहेत. विविध प्रांतांमधील मराठी माणसे एकत्र असली की उत्साहाचे उधाण और असते. तोच प्रकार अर्जुननगर सोसायटीत पाहण्यास मिळतो.

सण, उत्सव, सोसायटीचे स्नेहसंमेलन, सार्वजनिक पूजा किंवा सोसायटीच्या कुणा कुटुबीयांच्या घरी कोणताही कार्यक्रम असो. सोसायटीतील सर्व सदस्य झाडूनपुसून त्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात. दु:खाचा प्रसंग कोणाच्या वाटय़ाला आला तर त्या कुटुबीयांना आधार देतात. सदनिका (फ्लॅट) संस्कृती या सोसायटीत पाहण्यास मिळत नाही. सकाळ, संध्याकाळ सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक मंडळी आवारात शतपावली करतात. संध्याकाळच्या वेळेत प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर खुच्र्या टाकून निवांत बसलेली असतात. आई-बाबा कामावरून येईपर्यंत मुले सोसायटीच्या मैदानात यथेच्छ खेळत असतात. पाचही इमारतींमधील कुटुंबे, तेथील प्रत्येक सदस्य, मुलांची एकमेकांशी, सोसायटीशी इतकी घट्ट नाळ जोडली आहे की, आता इतर कुठेही मोठय़ा सोसायटीत राहावयास जावे असे कोणाला वाटत नाही. काही कुटुंबीयांनी मोठय़ा गृहसंकुलात जाण्याची तयारी केली होती; परंतु घरातील मुलांनी असा काही कडवा विरोध केला की, ‘तुम्ही जा तिकडे, आम्ही येथेच राहतो’ असा आक्रमक पवित्रा मुलांनीच घेतल्याने, मुलांच्या हट्टापायी अनेकांना नवीन संकुलात जाण्याचा विचार सोडून द्यावासा वाटला, असे काही कुटुंबीयांनी सांगितले.

सोसायटीचे वार्षिक स्नेहसंमेलन असते. दोन दिवस अख्खी सोसायटी या कार्यक्रमात सहभागी होते. नाचगाण्यांचे भरगच्च कार्यक्रम महिला, मुले आयोजित करतात. हौशी पुरुष मंडळी या कार्यक्रमात सहभागी होतात. नवरात्रोत्सवाच्या काळात गरब्याचा कार्यक्रम असतो. दिवाळीच्या काळात सगळी मुले एकजीव होऊन किल्ला तयार करतात. सलग दुसऱ्यांदा सोसायटीला किल्ले स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे.

बहुतेक घरांत चार चाकी, दुचाकी वाहने आहेत. वाहने ठेवण्यासाठी चार चाकी, दुचाकी वाहनतळ आहेत. सोसायटीच्या आवारात फुलझाडे आहेत. तळमजल्यावरील रहिवासी या झाडांना नियमित पाण्याची फवारणी करतात. त्यामुळे हिरवीगार टवटवीत झाडे सोसायटीचे वैभव आहे. सोसायटीचा कारभार जुनी-जाणती मंडळी पाहत आहेत. दैनंदिन खर्च, त्याची वसुली यावर समितीची देखरेख असते. सोसायटीच्या बैठका, लेखापरीक्षण नियमित केले जाते. सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे, शिस्तीत चालेल याकडे सोसायटी विश्वस्तांचा प्रयत्न असतो. ती परंपरा आज एकोणीस वर्षे सोसायटीने जपली आहे.