कल्याण, डोंबिवलीत पोलिसांची कडक कारवाई

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारपासून विनाकारण बाजारात फिरणारे, रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन फिरणारे अशा एकूण ७०० जणांची पोलिसांनी चौकशी केली. प्रवासाचे सबळ कारण असेल त्यांना पुढील प्रवासाला मुभा देण्यात आली. जे अनावश्यक वाहने घेऊन बाहेर पडले होते, अशा सुमारे २५० जणांना शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्रावर नेऊन त्यांची करोना चाचणी करण्यात आली. या तपासणीत एकही करोनाबाधित आढळलेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही संख्या आणखी कमी करण्यासाठी बाजार, रस्त्यांवरील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने रहिवासी अधिक संख्येने रस्त्यावर दिसू लागले आहेत. वाहने अधिक संख्येने रस्त्यावर येऊ लागली आहेत. करोना रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी गर्दीवर बंधने असणे आवश्यक असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी एका बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची करोना शीघ्र प्रतिजन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या चाचणीत अहवाल         (पान ४ वर)

विनाकारण फिरणाऱ्या २५० जणांची चाचणी

सकारात्मक आल्यानंतर संबंधितांची परस्पर करोना काळजी केंद्रात रवानगी करायची, असाही निर्णय घेण्यात आला होता. १ जूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी रविवार सकाळपासून कल्याण, डोंबिवली क्षेत्रात सुरू झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौकात पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत. सबळ कारण असल्याशिवाय वाहनचालकाला पुढे जाऊ दिले जात नाही. डोंबिवलीत विनाकारण फिरणाऱ्यांना रामनगर पोलीस ठाण्यातील चाचणी केंद्रात तर कल्याणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना शिवाजी चौकाजवळील महाजनवाडी सभागृहात नेऊन त्यांची करोना शीघ्र प्रतिजन चाचणी केली जात आहे. कल्याणमध्ये दिवसभरात २३३ वाहनांना अडवून त्यातील चालकासह प्रवाशांची महाजनवाडी सभागृहात चाचणी करण्यात आली. अनेक वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची वाहने वाहतूक शाखेत जमा करण्यात आली.

वडापाव केंद्र जोरात

डोंबिवली रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ भागात कठोर निर्बंधांचे पालन केले जात असताना शहराच्या मोठागाव, जुनी डोंबिवली, देवीचा पाडा, गरिबाचा पाडा, महाराष्ट्रनगर, नवापाडा भागात काही किराणा दुकानचालक, भाजी विक्रेते, वडापाव केंद्रचालक दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करतात, अशा तक्रारी आहेत. मागील अनेक दिवसांपासून गरिबाचा पाडा भागातील श्रीधर म्हात्रे चौकात सकाळ-संध्याकाळ खिडकीतून वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. येथे संध्याकाळी ग्राहकांची गर्दी असते. अशीच गर्दी संत तुकाराम मार्गावर एका वडापाव केंद्राच्या बाहेर असते. या केंद्रातील साहित्य दोन दिवसांपूर्वी ह प्रभागाच्या पथकाने जप्त केले होते. तरीही केंद्रचालक व्यवसाय सुरू ठेवून गर्दी जमवत असल्याच्या तक्रारी आहेत.

दहा दुकानांना टाळे

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, टिटवाळ्यात मांडा, बल्याणी परिसरातील अनेक व्यापारी दुकाने उघडी ठेवत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याआधारे पालिकेच्या पथकाने या भागांमध्ये रविवारी धाड टाकून त्यामध्ये १० दुकानांवर कारवाई केली. या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. रमजान सणानिमित्त बल्याणी भागात तेथील रहिवाशांच्या मागणीवरून दोन दिवस शिथिलता दिली होती. त्याचा गैरफायदा काही व्यापारी घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रविवारी किराणा, शिंपी, विद्युत सामान, खाद्यपदार्थांची सहा दुकाने टाळे लावून बंद करण्यात आली.