eyes‘भी क नको, पण कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ आम्हा मुलांवर आता आली आहे. पूर्वी वार्षिक परीक्षा संपल्या, की एप्रिल आणि मे हे दोन महिने मुलांना अक्षरश: रान मोकळे असायचे. अर्धीअधिक मुले सुटी लागताच मामाच्या गावी जायची. उर्वरित घरासमोरील मैदानात सकाळ-संध्याकाळ कंटाळा येईस्तोवर खेळायची. दुपारच्या वेळी घरातल्या घरात किंवा अंगणातल्या मोठी सावली देणाऱ्या झाडाखाली बैठय़ा खेळांचे डाव रंगायचे. पत्ते, सापशिडी आणि व्यापाराचा अक्षरश: धुडगूस चालायचा. आता मैदाने, घरासमोर अंगण आणि सुटीमध्ये आपुलकीने शहरातल्या भाच्यांची आपुलकीने वाट पाहणारे गावाकडचे मामा दुर्मीळ झाले. मला हे सर्व कळलंही नसतं बहुधा, पण मोठय़ा लेखकांच्या ललित लेखांनी आम्हाला त्या सुटीच्या सुवर्णयुगाविषयी समजले. आधीची म्हणजे माझ्या आई-वडिलांची पिढी त्याबाबत नशीबवान, कारण त्यांना कोणतेही बंधन नसणारी सुटी अनुभवता आली. त्या सुवर्णयुगाचे ते साक्षीदार आहेत. ‘आमच्या वेळी असे नव्हते’ या पालुपदाने सुरू होणाऱ्या बोधामृतांमध्ये कधीकधी जेव्हा ते सुटीतल्या गमतीजमती सांगतात, तेव्हा आम्हाला त्यांचा हेवा वाटतो.
आता वार्षिक परीक्षा संपल्या, की पालक आम्हाला लगेच छंदवर्गात टाकतात. मला आठवतंय तिसरीला मी गाण्याच्या क्लासला जायचो. तिथे सुरांचे माझे फारसे जमत नसल्याचे लक्षात आल्यावर पुढील वर्षी माझी रवानगी चित्रकलेच्या वर्गात करण्यात आली. तिथेही चार रेघोटय़ा मारण्यापलीकडे मी फार काही प्रगती करू शकलो नाही. त्यामुळे सहावीत पुन्हा गिटार शिकायला लावले. दोन-चारदा बोटे फोडून घेतल्यानंतर तिचा नाद सोडला. क्रिकेट आणि बॅटमिंटनमध्येही माझे कौशल्य अजमाविण्यात आले. मात्र ज्याला ‘एक्स्ट्रा करिक्युलम अ‍ॅक्टिव्हिटी’ म्हणतात त्यापैकी कशातही मी फारशी प्रगती करू शकलो नाही. त्यामुळे अभ्यासाशिवाय याला दुसरेतिसरे काहीही जमणार नाही, याची खात्रीच आता आई-वडिलांना पटली आहे. यंदा सातवी उत्तीर्ण होऊन मी आठवीत जाईन. (म्हणजे अजून निकाल लागायचा आहे, पण आता जाणार हे तर नक्कीच आहे ना. कारण हल्ली नापास करण्याची पद्धतच नाही.) पाचवीत असल्यापासून ज्या महत्त्वाच्या इयत्तेची सारखी भीती घातली जातेय, ती दहावी आता अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरात आतापासूनच वातावरणनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे यंदा परीक्षा झाल्या झाल्या माझे नाव दहावी पूर्वतयारी शिबिरात घालण्यात आले. मी मनातल्या मनात म्हटले, ‘अहो, मला आधी आठवीत जाऊ द्या. दहावीला दोन वर्षे अवकाश आहे. का आमची सुट्टी वाया घालविताय? इथे काल काय केलं ते आज आठवत नाही, तर दहावीच्या परीक्षेच्या सूचना तीन वर्षे लक्षात राहणार आहेत का?’ पण आमचे कोण ऐकतो. शाळा सुरू असताना जितके काटेकोर वेळापत्रक नसते, तितके सुटीचे आहे. मागच्या पिढीचे बरे होते. त्या वेळी मुलांवर संस्कार करणारी असली शिबिरे नव्हती. एकदा मनातल्या मनात येणारा हा विचार आमच्या तीर्थरूपांना सांगितला. त्यावर त्यांनी ‘सगळं मिळतंय तरीही घेता येत नाही’ या पालुपदाने नेहमीचेच उपदेश पाजून नाराजी व्यक्त केली.
पुढच्याच आठवडय़ात सातवीचा निकाल लागला, की लगेचच आठवीचा क्लास सुरू होणार आहे. तोपर्यंत दोन-चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे जरा मनासारखी सुटी एन्जॉय करता येतेय. वर्गमित्रांच्या गाठीभेटी सुरू आहेत. कालच दिलीपच्या घरी गेलो होतो. तो निबंध वगैरे छान लिहितो. त्याने शाळा आणि क्लासला पिंजरा नाव ठेवले आहे. शिक्षणाच्या नावाखाली आपली एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात रवानगी होत असते. सुटीत ‘फॉर ए चेंज’ आपला फक्त पिंजरा बदलतो. शाळांची जागा विविध प्रकारची शिबिरे घेतात, असे तो म्हणतो. दिलीपचे हे म्हणणे मला तंतोतंत पटते. त्याच्यातील लेखन गुणांना, कल्पकतेला नीट वाव मिळाला तर तो भविष्यात आमच्या पिढीतला लेखक होईल, असे मला वाटते. मोठा लेखक झालास की, ‘सुट्टी वाया घालविणारी शिबिरे’ या विषयावर ललित लेख लिहून या व्यवस्थेवर सूड उगव, असे मी त्याला आताच सांगून ठेवले आहे.
महादेव श्रीस्थानककर