डोंगर पठारावर भेंडीचे भरघोस उत्पादन; पावसाळय़ातील भातशेतीखेरीज वर्षभर फळभाज्यांची शेती

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : पावसाळय़ातील चार महिने भातशेती केल्यानंतर उरलेले आठ महिने मोलमजुरी किंवा रोजंदारीवरची कामे करून जीवन व्यतीत करणाऱ्या आदिवासी, ठाकर समाजाने गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन कृषिमालाचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली आहे. शहापूर तालुक्यातील डोंगर पठारावरील उपलब्ध पाणीसाठय़ाचा वापर करून येथील ठाकर समाज भेंडीचे भरघोस उत्पादन घेत आहे. ही भेंडी महामार्गालगत तसेच नजीकच्या शहरांतील बाजारात विकून गाठीला पैसा बांधला जात आहे.

शहापूर तालुक्यातील डोळखांब, मुसई, मानेखिंड, चरीव डोंगर खोऱ्यात आदिवासी पाडे अधिक संख्येने आहेत. या पाडय़ांवर ठाकर समाज राहतो. पावसाळी भात, उडीद, नागलीची पिके घ्यायची. याच कालावधीत परिसरातील गावांमध्ये मजुरी करायची असा या समाजातील मंडळींचा नित्यक्रम. कष्टाला कल्पकतेची जोड दिली तर आपण आपल्या कष्टातून चांगले पैसे कमवू शकतो याची जाणीव झाल्याने ठाकर समाजातील बहुतांशी वर्ग पावसाळ्यात भातशेती, नागली, वरई लागवडीची कामे झाली की भेंडी लागवड करतो. भेंडीपासून एक ते दीड महिन्यात उत्पादन सुरू होते. ही भेंडी घेऊन आजूबाजूच्या बाजारात, तालुक्याच्या ठिकाणी नेऊन विकली जाते. दिवाळी, भातकापणीचा हंगाम संपला की गेल्या चार ते पाच वर्षांपासून ठाकर समाजातील मंडळी तलाव, पाणवठे, कॅनॉलच्या बाजूला भेंडीची लागवड करतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागवड केलेली भेंडी जानेवारी-फेब्रुवारीपासून दर पंधरा दिवसांनी उत्पादन द्यायला सुरुवात करते. एका वेळी ५०० ते ६०० भेंडीची बुडं लावली जातात. कुटुंबातील सदस्य २४ तास शेतात राबतात. त्यामुळे कोणाला मजुरी देण्याचा प्रश्न येत नाही. पाण्याच्या कडेला लागवड केली जाते. त्यामुळे पाणी कुठून उचलून आणण्याची गरज लागत नाही. तयार देखणी, वजनदार, चवदार भेंडी कल्याण बाजार समिती, शहापूर बाजार समिती, वाशी बाजार समितीत नेऊन घाऊक पद्धतीने विकली जाते. काही घाऊक व्यापारी शेतक ऱ्यांच्या बांधावर येऊन भेंडी खरेदी करून जातात. त्यामुळे शेतक ऱ्यांना शेताच्या बांधावर केलेल्या कष्टाचे पैसे मिळतात. या लागवडीत घरातील महिलांचा मोठा वाटा असतो. जानेवारी ते मेअखेपर्यंत भेंडीचे ७० ते ८० तोडे होतात. चांगला बाजारभाव भेंडीला मिळतो. त्यामुळे खर्च वजा जाता भेंडी लागवडीतून या शेतक ऱ्यांना उत्तम नफा मिळू लागला आहे. काही शेतकरी गट समूहाने, काही जण गटाने शेतकरी करतात. मिळालेला नफा समान पद्धतीने वाटून घेतात, असे जानू वाख या भेंडी उत्पादक शेतक ऱ्याने सांगितले.

भाजीपाल्यावर भर

अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या तालुक्यांत आदिवासी ठाकूर समाज पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन उत्पादन घेऊ लागला आहे. समूहाने हापूस, केसर आंबा, चिकू या फळांच्या बागा ते विकसित करत आहेत. समूहाने विक्री होत असल्याने उत्तम दर मिळतो. आता भेंडी, दुधी, कारली, काकडी यांसारख्या फळभाज्या, पालेभाज्या आदिवासी समाजातील शेतकरी नियमित घेऊ लागले आहेत. गेल्या वर्षांत भातशेतीला आंतरपीक म्हणून तुरीची लागवड मोठय़ा प्रमाणावर ठाणे जिल्ह्य़ात घेण्यात आली. यामध्येही आदिवासी समाजाचा वाटा मोठा होता. वन हक्क कायद्याने मिळालेल्या वनपट्टय़ात ही शेती गेल्या काही वर्षांत बहरू लागली आहे.

नीलगाईंचा त्रास

गेल्या काही वर्षांपासून भेंडी लागवडीला नीलगाईंचा खूप त्रास होतो. शेतीकडे थोडे दुर्लक्ष केले तरी नीलगाई काही तासांत लागवडीचा फडशा पाडतात. त्यामुळे लागवडीच्या ठिकाणी २४ तास जागता पहारा द्यावा लागतो, असे लखू केवारी यांनी सांगितले. नीलगाई, रानडुक्कर यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी लागवडधारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.