ठाणे : ‘ग्रीन वर्कस् ट्रस्ट’ संस्थेतर्फे नुकतेच पक्ष्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात ६० विविध पक्ष्यांची छायाचित्रे पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळाली. तसेच खाडी किनाऱ्यावर पक्षी निरीक्षण करण्याचा आनंदही ठाणेकरांना अनुभवता आला.

दुर्मीळ पक्ष्यांना पाहण्यास पक्षीप्रेमी आतुर असतात. अशा दुर्मीळ पक्ष्यांची ओळख ठाणेकरांना पटवून देण्यासाठी ग्रीन वर्कस् ट्रस्ट संस्थेतर्फे कोपरी येथील अष्टविनायक चौकातील खुल्या कलादालनात दुर्मीळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. एकूण ६० पक्ष्यांची छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. यामध्ये मोठा अग्निपंख, समुद्री बगळा, छोटा टिलवा, रात ढोकारी, रंगीत ढोकारी अशा अनेक पक्ष्यांच्या छायाचित्राचाही सामावेश होता. या छायाचित्राखाली पक्ष्याचे नावही लिहिले होते. त्यामुळे प्रदर्शन पाहणाऱ्यासाठी येणाऱ्या ठाणेकरांना छायाचित्रात कोणता पक्षी आहे आणि छायाचित्रकार कोण आहे, याची माहिती मिळत होती.

प्रदर्शनासोबतच ठाणेकरांना पक्षी निरीक्षणाचे धडेही देण्यात आले. पर्यावरणप्रेमी संस्थेतर्फे प्रदर्शनात छायाचित्र लावण्यात आलेल्या काही पक्ष्यांचे निरीक्षण लहान मुलांना कोपरी खाडी येथील गणेश विसर्जन घाटावर नेऊन दुर्बिणीद्वारे करण्यास शिकवले. लहान मुले तसेच तरुणांनी या प्रदर्शनाला मोठय़ा प्रमाणात भेट दिली. या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे अनेक नव्या पक्ष्यांची माहिती मिळाली. या प्रदर्शनात खाडीकिनारी येऊन दुर्मीळ पक्ष्यांचे निरीक्षण करता आले. विविध पक्ष्यांची ओळख झाली. असे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या तेजल अहिरराव या लहान मुलीने सांगितले.