ठाण्यातील रक्तपेढीकडून १००१ रक्तद्रव पिशव्यांचे संकलन

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लस अद्याप आली नसली तरी विविध उपचार पद्घतीने करोनाबाधित रुग्णांना बरे करण्याचे काम डॉक्टरांकडून सुरू आहे. रक्तद्रव (प्लाझ्मा थेरपी) उपचार पद्धतीचा यासाठी विशेषत्वाने वापर केला जात आहे. त्यासाठी कोकण विभागात १३ रक्तपेढय़ांना रक्तद्रव संकलनासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने परवानगी दिली असून या रक्तपेढय़ांनी आतापर्यंत रक्तद्रवाच्या २७८२ पिशव्यांचे संकलन केले आहे. त्यात ठाणे शहरातील ‘ब्लड लाइन’ या रक्तपेढीने सर्वाधिक म्हणजेच १००१ पिशव्यांचे संकलन केले आहे. त्यामुळे रक्तद्रव दान करण्यामध्ये ठाणे शहर अव्वल असल्याचे चित्र आहे.

करोनाबाधितांवर उपचार करताना रक्तद्रव पद्धतीचा वापर केला जात आहे. रक्तद्रव संकलनासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून रक्तपेढय़ांना परवानगी देण्यात येते. कोकण विभागात एकूण १३ रक्तपेढय़ांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये नालासोपारा, ठाणे, कोपरखरणे, कामोठे, डोंबिवली, मीरा-रोड, कल्याण, रत्नागिरी या भागांतील रक्तपेढय़ांचा समावेश आहे. या सर्वच रक्तपेढय़ांमध्ये आतापर्यंत १ हजार ६६६ जणांना रक्तद्रव्य दान केले असून त्यातून २ हजार ७८२ रक्तद्रव्य पिशव्या तयार झाल्या आहेत. एक पिशवी २०० मिलीलिटरची आहे. काही रुग्णांकडून दोन रक्तद्रव पिशव्यांचे संकलन होते तर काहींकडून एकाच पिशवीचे संकलन होते. २ हजार ७८२ पैकी २ हजार ७०२ रक्तद्रव पिशव्या आतापर्यंत रुग्णांना देण्यात आल्या आहेत. तर, ८० रक्तद्रव पिशव्या शिल्लक आहेत.

ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीत आतापर्यंत ७६३ जणांनी रक्तद्रव्य दान केले असून त्यातून १००१ रक्तद्रव्य पिशव्या संकलित झाल्या आहेत. त्यातील ९८७ रक्तद्रव्य पिशव्या रुग्णांना देण्यात आल्या आहेत. तर केवळ १४ पिशव्या शिल्लक आहेत.  यासंदर्भात रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. शिल्पा जैन यांना विचारले असता, रक्तद्रव संकलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच रक्तद्रव संकलन दर्जा चांगला असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांच्या आसपास आहे, असे त्यांनी सांगितले.

रक्तद्रव संकलन

रक्तपेढी                   शहर            रक्तद्रव दाते  जमा पिशव्या   दान   शिल्लक

सहित्य ट्रस्ट              नालासोपारा     ५९            ११३               ११०              ३

ब्लड लाइन                   ठाणे            ७६३           १००१              ९८७              १४

रिलायन्स रुग्णालय      कोपरखैरणे  ४२             ८१                    ८०              १

अपोला रुग्णालय        नवी मुंबई      ११०            २२६                 २१९             ७

महात्मा गांधी रुग्णालय   कामोठे       ३१              ५७                   ५६             १

प्लाझ्मा ब्लड बँक       डोंबिवली        १७०             ३४१               ३३२             ९

महापालिका रक्तपेढी     मीरा रोड       १४४            २८८               २७३           १५

संकल्प रक्तपेढी       कल्याण             १६५            ३२१               ३२१            ०

महात्मा गांधी रक्तपेढी    ठाणे              ९                  १८               १८            ०

अर्पण रक्तपेढी         कल्याण              १३७             २७४              २७२            २

लोकमान्य टिसा रक्तपेढी ठाणे             १६                 ३२               १७            १५

सद्गुरू रक्तपेढी       कोपरखैरणे           ९                    १८              १७          १

एकूण                                                 १६६६            २७८२              २७०२        ८०

कोकण विभागातील १३ रक्तपेढय़ांमध्ये आतापर्यंत १ हजार ६६६ रक्तद्रव दात्यांकडून २ हजार ७८२ रक्तद्रव पिशव्यांचे संकलन झाले आहे. २ हजार ७०२ रक्तद्रव पिशव्या रुग्णांना देण्यात आल्या आहेत, तर ८० रक्तद्रव्य पिशव्या शिल्लक आहेत. त्यामुळे कोकण विभागात रक्तद्रव संकलनाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे.

– विराज पौणीकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग

 

करोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी रक्तद्रव उपचार पद्धत महत्त्वाची मानली जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत असलेल्या ब्लड लाइन रक्तपेढीचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून त्याचा रुग्णांना फायदा होत आहे.

– डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका