ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गेल्या आठवडय़ात हाती घेतलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे विस्कळीत झालेला ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा आठवडा होत आला तरी सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख महापालिका, नगरपालिकांची त्रेधा उडाली असून, वागळे इस्टेट, डोंबिवली औद्योगिक पट्ट्यात पाण्याअभावी कंपन्या बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये विविध स्त्रोतांमार्फत पाणीपुरवठा होतो. त्यापैकी ‘एमआयडीसी’ हा महत्वाचा स्त्रोत मानला जातो. बारवी धरणातून उल्हास नदीपात्रात सोडलेले पाणी ‘एमआयडीसी’ शहरांमध्ये पुरवते. त्यात ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, तळोजा आणि बदलापूरच्या काही भागांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात गुरुवारी सकाळी ‘एमआयडीसी’ने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मुदतीत काम पूर्ण करण्यात ‘एमआयडीसी’च्या अभियंत्यांना यश आले नाही. त्यामुळे वाढीव १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ ते ३६ तासानंतर ‘एमआयडीसी’चा पाणीपुरवठा सुरळीत होईल या आशेवर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी तशाप्रकारे पाणी वितरणाचे नियोजन केले होते. ‘एमआयडीसी’नेही शनिवारी सकाळी काम पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु केला आणि सायंकाळी पाण्याचा दाब वाढविण्यात आला. या दाबावर नियंत्रण ठेवण्यात अभियंता विभागाला अपयश आले आणि शिळफाटा मार्गावरील खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे ठाण्यासह आसपासच्या शहरांचा पाणीपुरवठा पुन्हा खंडीत झाला. फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम आटोपून ‘एमआयडीसी’ने रविवार दुपारनंतर शहरांचा पाणीपुरवठा पूवर्वत करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र तोवर वितरण व्यवस्था कोलमडली. कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली.

ठाणे महापालिकेने ही टंचाई दूर करण्यासाठी इतर स्त्रोतांचे पाणी कळवा, मुंब्य्राकडे वळविले. त्यामुळे घोडबंदर, वर्तकनगर पट्टयात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. डोंबिवलीतही अनेक ठिकाणी पाणी वितरणाचा बोजवारा उडाला. वागळे इस्टेटमधील औद्योगिक वसाहत, कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवली एमआयडीसी, २७ गाव परिसर, अंबरनाथ, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, तळोजा आणि बदलापूरच्या काही भागातील नागरिकांचे गेल्या सहा दिवसांपासून पाणी हाल सुरुच आहेत. पाणीटंचाईचा फटका निवासी भागांसह औद्योगिक पट्टयांना मोठय़ा प्रमाणावर बसला.

शहरी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधील वाढता संताप लक्षात घेत ‘एमआयडीसी’ने  नागरी वस्त्यांसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे औद्योगिक पट्टयात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे.

निम्म्या कर्मचाऱ्यांना सुट्टी

ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक पट्टयात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने येथील उद्योजकांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी पाण्याच्या टँकरचे दरही वाढविण्यात आल्याच्या तक्रारी उद्योजक संघटनांनी केल्या आहेत.