विजेच्या तुटवडय़ामुळे राज्यभर सुरू केलेल्या अघोषित भारनियमनाचा फटका मंगळवारी दिवसभर ठाणेकरांना सोसावा लागला. सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील अनेक भागांत खंडित झालेल्या वीजपुरवठा दुपापर्यंत सुरळीत झाला नव्हता. तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित झाला असेल, अशा कल्पनेत असलेल्या ठाणेकरांनी, दोन तासांनंतरही वीज न आल्याने चौकशी सुरू केली. तेव्हा हा अघोषित भारनियमनाचा भाग असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शहरात आता रोजच भारनियमन होणार, अशी चर्चाही सुरू झाली, मात्र कमी पावसामुळे असे अघोषित भारनियमन करावे लागले, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी हे भारनियमन कधी होईल व कधी बंद होईल, हे सांगणे कठीण असल्याचेही महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाने अचानक दडी मारल्यामुळे वीजनिर्मितीची प्रक्रिया थंडावली आहे. कृषी पंपांसाठी विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली आहे. याच टंचाईचा फटका मंगळवारी सकाळी ठाणेकरांना बसला. बी-केबीन परिसर, नौपाडा, पाचपाखाडी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, स्टेशन रोड, राममारुती रोड, गोखले रोड या भागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित झाला. डोंबिवली, कल्याणच्या काही भागांतही सकाळी ६पासून वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरणच्या वतीने भांडुप आणि कल्याण परिमंडळाच्या ग्राहकांसाठी केवळ दोन हेल्पलाइन क्रमांक दिले असल्याने ठाणे, कल्याण आणि डोंबिवली भागातून हजारो ग्राहकांच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला होता. मात्र अनेक वेळा या क्रमांकावर संपर्कच होऊ शकत नव्हता, असे काही नागरिकांनी सांगितले.

पूर्वसूचना तरी द्यावी..
‘महावितरणवर ऊर्जा संकट आहे, याची कल्पना आम्हाला आहे. त्यासाठी ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी भारनियमन करण्याची गरज आहे. मात्र ग्राहकांची कोणतीच काळजी महावितरणच्या वतीने घेतली जात नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांच्याकडूनही विजेच्या भारनियमनाच्या कालावधीविषयी काहीच माहिती मिळत नाही, हे खूपच दुर्दैवी आहे,’ अशी प्रतिक्रिया पाचपाखाडी परिसरातील वासुदेव जोशी यांनी दिली.

अघोषित भारनियमन अडीच तास!
‘विजेच्या मागणी आणि पुरवठय़ातील तफावतीमुळे  राज्यात तीव्र वीजटंचाई भासत आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील वीजपुरवठा वेगवेगळय़ा वेळेत दोन ते अडीच तास बंद करण्यात येणार आहे. ही परिस्थिती कधीपर्यंत नियंत्रणात येईल हे नेमके सांगता येणार नाही. हे भारनियमन अडीच तासांपेक्षा जास्त नसेल,’ अशी माहिती महावितरणच्या भांडुप परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी दिली.