ठाण्याच्या जवानांची महालक्ष्मी एक्स्प्रेस बचाव कार्यात निर्णायक कामगिरी

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

तीन ते चार किमी अंतर पार करून पोहचलेल्या डोंगराच्या टेकडीवरून चोहूबाजूने पाण्याच्या वेढय़ात अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस पाहून अंगावर शहारे आले. पण, एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका करायची हेच आमच्या डोक्यात होते आणि त्यासाठी आम्ही पाण्यात उतरून दीड किमीपर्यंत दोरखंडाने प्रवास केला. काटेरी झुडपे आणि काचांमुळे पायाला जखमा झाल्या. पण आम्हाला पाहून ‘देवदूत आले आता आम्ही वाचणार’ असे शब्द एका महिला प्रवाशाने उच्चारले आणि आमच्या वेदना विसरून आम्हाला मदतकार्यासाठी स्फूर्ती मिळाली. शनिवारच्या मुसळधार पावसात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या बचाव कार्यात झोकून देणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दला (टीडीआरएफ) च्या जवानांनी त्या घटनेचा अनुभव ‘लोकसत्ता ठाणे’ शी बोलताना सांगितला.

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून त्यामधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी जायचे आहे, अशा सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे सहा वाजता ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांना दिल्या. त्यानंतर कदम यांच्याकडून निरोप मिळताच २४ जणांचे पथक घेऊन बदलापूरला निघालो. सकाळी ८.२५ वाजता त्याठिकाणी पोहचलो. पण, रस्ते वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही तिथेच वाहने सोडली आणि दुसऱ्या मार्गाने पायी प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान डोंगर टेकडीवरून एक्स्प्रेसपर्यंत जाऊ शकता, असे काही गावकऱ्यांनी सांगितले. हा रस्ता दाखविण्यासाठी एक नगरसेवक आणि काही गावकरी आमच्यासोबत आले, अशी माहिती टीडीआरएफचे उपकमांडो अरुण राऊत यांनी दिली. तीन ते चार किमी अंतर पार करून पोहचलेल्या डोंगराच्या टेकडीवरून चोहूबाजूने पाण्याच्या वेढय़ात अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस पाहून अंगावर शहारे आले. पण, एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका करायची हेच आमच्या डोक्यात होते आणि त्यासाठी आम्ही पाण्यात उतरून दीड किमीपर्यंत दोरखंडाने प्रवास केल्याचे टीडीआरएफच्या जवान सचिन डुबे यांनी सांगितले.

डोंगर टेकडी उतरून खाली गेलो, तिथे मानेइतके पाणी साचले होते आणि एक्स्प्रेसपर्यंतच्या रस्त्यांमध्ये विहिरी तसेच नाले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली होती. तरीही जवानांनी न थांबता पुढे चालणे सुरू ठेवले. संदेश घोडे हा बांबूने पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि त्या पाठोपाठ माझ्यासह चेतन तरोडे, सुधीर काळे हे दोरखंड घेऊन जात होते, असे डुबे यांनी सांगितले.

‘टीडीआरएफ’चे पथकच सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. तेव्हा ‘देवदूत आले, आता आम्ही वाचणार’ असे उद्गार एका महिला प्रवाशाने काढले. त्यामुळे आम्हालाही मदतकार्यासाठी स्फूर्ती मिळाली, असे एका जवानाने सांगितले.

महिला प्रवाशाचे धाडस

टीडीआरएफच्या पथकाकडे बोट नव्हती. केवळ दोरखंड हाती घेऊन ते बचावकार्यात सामील झाले होते. त्यामुळे एक्स्प्रेसमधील पोलीस कर्मचारीही प्रवाशांना त्यांच्यासोबत पाठवण्यास तयार नव्हते. ‘त्याच वेळी एका महिलेने पुढाकार घेऊन आमच्यासह येण्याची तयारी दर्शवली. ती व तिचा पती यांना घेऊन आम्ही निघालो व त्यांना सुखरूपपणे डोंगराच्या पायथ्याशी पोहोचवले. ते पाहून अन्य प्रवासीही पुढे आले. अशा प्रकारे अनेक प्रवाशांना सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात यशस्वी झालो,’ अशी माहिती एका जवानाने दिली.

टीडीआरएफकडे अशा घटनेत मदतकार्य करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. परंतु या पथकाला उत्तम प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले असून त्याच जोरावर पहिल्यांदाच पथकाने अशा प्रकारच्या मोठय़ा घटनेत चांगले मदतकार्य केले.

– अरुण राऊत, उपकमांडो, टीडीआरएफ.