घनकचरा प्रक्रिया केंद्र, थर्माकोलचे पुनर्चक्रीकरण प्रकल्पांसाठी प्रशासनाचा आग्रह; कामांच्या करारपत्रांवर आचारसंहितेपूर्वी स्वाक्षरी

ठाणे महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात पर्यावरणाभिमुख प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी सकाळी यासंबंधीच्या करारपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली. शहरात मोठय़ा प्रमाणावर निघणाऱ्या बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया करणारा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही यामुळे मार्गी लागणार असून, महामार्ग तसेच खाडीकिनारी टाकण्यात येणारा हा कचरा यामुळे आटोक्यात येईल, असा दावा केला जात आहे.

ठाणे महापालिकेने गेल्या दीड वर्षांत काही पर्यावरणाभिमुख प्रकल्पांचे सूतोवाच केले होते. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी यापैकी काही प्रकल्पांना सुरुवात केली जाणार असून डायघर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रही लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या चार महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये थर्माकोल प्रक्रिया, प्लास्टिकपासून वंगण तेल, बांधकाम व तोडफोड कचऱ्यापासून बांधकाम साहित्य आणि सामायिक जैव वैद्यकीय प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे ‘लेटर ऑफ इंटेट’ नुकतेच देण्यात आले.

थर्माकोल प्रक्रिया प्रकल्पामध्ये शहरातील १ टन प्रतिदिन थर्माकोलचे पुनर्चक्रीकरण करून त्यापासून फोटो फ्रेम, सीडी कव्हर बनविण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य निर्माण करण्यात येणार आहे. सीपी तलाव येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. ‘श्री. इन्सुपॅक थर्माकोल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. याच ठिकाणी प्लास्टिकपासून वंगण तेल बनविण्याचा प्रकल्प ‘अभय एनर्जी सोल्युशन’ या कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरी घनकचऱ्यातील कमी व्यावसायिक मूल्याच्या प्लास्टिकचा वापर करून त्यापासून बॉयोलर, फर्नेसिंगसाठी लागणारे वंगण तेल बनविण्यात येणार आहे. प्रतिदिन ५ हजार टनावर प्रक्रिया करण्याचा हा प्रकल्प आहे.

डेब्रिजमुक्तीचा संकल्प

ठाणे शहरात बांधकाम कचऱ्याचे प्रमाण मोठे असून खाडीकिनारी तसेच महामार्गाच्या कोपऱ्यांवर ते रिते केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. या कचऱ्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढल्याची चिंता महापालिकेच्या पर्यावरण अहवालात व्यक्त केली होती. त्यामुळे खाडीकिनारी तसेच महामार्गाच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या बांधकाम कचऱ्याला आळा बसावा यासाठी महापालिकेने या कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रकल्पास शुक्रवारी जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखविला. यामध्ये जवळपास ३०० टन कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करून टाइल्स, पेव्हर ब्लॉक, काँक्रीट ब्लॉक बनविण्यात येणार आहे. दिल्लीस्थित ‘मेट्रो वेस्ट हँडलिंग’ कंपनीच्या माध्यमातून डायघर येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डायघर येथेच ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या माध्यमातून ‘सामायिक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्र’ कार्यान्वित करण्यात होणार आहे. या सर्व प्रकल्पांचे ‘लेटर ऑफ इंटेट’ देण्यात आले.