मालमत्तेच्या वादातून गुन्हा केल्याचा संशय
घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात एका ८४ वर्षीय वृद्धाची आणि त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने या भागात एकच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
सीताराम वल्लभ श्रॉफ (८४) असे या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव असून त्यांच्यासोबत राहणारे संतोष वंगरे (४०) यांनाही मारेकऱ्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरातील रिजन्सी हाइट्स इमारतीच्या १५व्या मजल्यावर सीताराम श्रॉफ (८४) राहायचे. त्यांना दोन मुलगे आहेत. थोरल्या मुलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तसेच धाकटा मुलगा त्यांच्यापासून वेगळा मुंबई परिसरात राहतो. थोरल्या मुलाची मुलगी ऋतिका (२८) ही सीताराम यांच्याकडे राहते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. त्यामुळे सीताराम आणि संतोष हे दोघेच घरात होते. दुपारच्या सुमारास मारेकरी त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी हत्या केली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऋतिका कामावरून घरी परतली त्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोघांचे मृतदेह तिने पाहिले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन मारेकरी?
सीताराम यांची मुंबईतील प्रभादेवी परिसरात मालमत्ता होती आणि या मालमत्तेची त्यांनी नुकतीच विक्री केली होती. त्यातून त्यांना चार कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडलेला आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. या हत्याकांडात तीन मारेकरी असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
‘पूजेला जायचे आहे’
रिजन्सी हाइट्स इमारतीच्या १७व्या मजल्यावरील एका घरात मंगळवारी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. ‘पूजेला जायचे आहे’ असे सांगून अनेक जण या ठिकाणी जात होते. अशा पाहुण्यांची सुरक्षारक्षकाने नोंदणी केली नसल्याचे तपासात समोर आले आहे. नेमकी हीच संधी साधून पूजेचे कारण पुढे करत मारेकऱ्यांनी इमारतीत प्रवेश मिळविला असावा, असा अंदाज आहे.