|| गीता कुळकर्णी

दोन महिन्यांत गुन्हेगारीत घट

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आखलेल्या योजनांना यश मिळत असून मागील दोन महिन्यांत गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे. पोलिसांकडून सातत्याने सुरू असलेल्या कारवाया, गस्ती, फरार आरोपींचा शोध आणि न्यायालयातील दोषारोपपत्रांमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख कमी होत आहे, असा दावा  पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यामध्ये ९१० गुन्हे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील शहरी भागात घडले. याच महिन्यात पोलिसांनी ४४४ गुन्ह्य़ांची उकल केली आहे. पूर्वी हाच गुन्हेगारीचा आकडा सुमारे चार ते पाच हजारांच्या घरात होता. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील एकूण ३५ पोलीस ठाणे येतात. गेल्या वर्षभरात या भागातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढता होता. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलिसांनी धडक मोहिमा हाती घेतल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी गस्ती घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नाना-नानी उद्यानात जाऊन प्रबोधन करणे, सोनसाखळी चोरांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणे, आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे, रात्री तसेच पहाटेच्या वेळी चालत आणि दुचाकीने महामार्ग तसेच मुख्य रस्त्यांवर गस्ती घालणे अशा कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे शहरांतील गुन्हेगारीवर वचक बसल्याचे बोलले जात आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांचा गुन्हेगारीचा आलेख तपासला असता २०१९ मधील जून महिन्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळे एकूण ६ हजार ७०८ गुन्हे, जुलै महिन्यात ६ हजार ७०८, ऑगस्टमध्ये ७ हजार ५७६, सप्टेंबरमध्ये ८ हजार ३५७, ऑक्टोबरमध्ये ९ हजार १७५, नोव्हेंबरमध्ये १० हजार १५, डिसेंबरमध्ये १० हजार ९८१ गुन्हे घडले होते. मात्र, जानेवारीमध्ये या गुन्ह्य़ांचे प्रमाण थेट ९१० इतके झाल्याचे उघड झाले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाई वाढविली आहे.   दररोज गस्ती सुरू असतात. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस आणि पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांकडूनही वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. फरार आरोपींचाही पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्ह्य़ांमध्ये घट झालेली आहे.

-प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस.