|| जयेश सामंत-नीलेश पानमंद

परराज्यांतून शहरात येणाऱ्यांच्या चाचण्यांत वाढ; तीन दिवसांपासून रोज एक हजार चाचण्या

ठाणे : परराज्यांतून शहरात येणाऱ्या प्रवाशांना तात्काळ गाठून त्यांची करोना चाचणी करण्याचा प्रयोग ठाण्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरू केला असून गेल्या तीन दिवसांपासून दररोज ठाणे रेल्वे स्थानकात एक हजार प्रवाशांची चाचणी केली जात आहे. यासाठी शीघ्र प्रतिजन चाचणीचा अधिकाधिक वापर केला जात असून होकारात्मक येणाऱ्या रुग्णांना तातडीने विलगीकरणात पाठविले जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मुंबई, ठाणे तसेच कल्याण परिसरात परराज्यांतून परतणाऱ्या गाड्यांचा थांबा असून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये परतत आहेत. या नागरिकांची स्थानकांवर चाचणी करण्याची मोहीम महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून एक हजारांहून अधिक प्रवाशांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. या चाचण्यांमधून मोठ्या संख्येने करोनाबाधित सापडत असून त्यांचे तातडीने विलगीकरण केले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरासरी ५७०० चाचण्या

ठाण्यात सुरुवातीला दररोज ७०० ते ८०० करोना चाचण्या केल्या जात होत्या. गेल्या काही महिन्यांपासून चाचण्यांची संख्या प्रशासनाने वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ५७०० चाचण्या केल्या जात असून रुग्णसंख्या वाढत असली तरी अलगीकरण करणे यानिमित्ताने सोपे जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले.  यापूर्वी चाचण्यांची संख्या कमी होती, त्यावेळी दररोज सरासरी ४००च्या पुढे रुग्ण आढळून येत होते. सध्याचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण लक्षात घेता, चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर शहरात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

सॅटिस पुलाखाली चाचण्या

ठाणे स्थानकात परराज्यातून रेल्वे मार्गे येणाऱ्या नागरिकांची तीन ते चार जणांच्या पथकाकडून सॅटिस पुलावर शीघ्र प्रतिजन करोना चाचणी करण्यात येते. चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी थांबविण्यात येते. अहवालात करोनाची लागण झाल्याचे समोर आले तर संबंधिताला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. ज्यांचे अहवाल नकारात्मक आहेत, त्यांना घरी पाठविले जाते. मात्र अनेकजण चाचण्या टाळण्यासाठी सॅटिस पुलाखालून घरी निघून जात असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे पालिकेच्या पथकाने आता सॅटिस पुलाखालीही शीघ्र प्रतिजन करोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. अशाचप्रकारे ठाणे पूर्व स्थानक परिसरातही केंद्र उभारण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.