विभाजनानंतर ठाणे हा मुख्यत: मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी अजूनही ग्रामीण भागातील एक लाख ३२ हजार ८०० कुटुंबे फक्त शेतीवर अवलंबून आहेत. भात हे जिल्ह्य़ातील प्रमुख पीक आहे. खरीप हंगामात एकूण ६७ हजार २१७ हेक्टर क्षेत्रापैकी ६० हजार ११७ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. परंपरेने उदरनिर्वाहाचा उत्तम पर्याय असे म्हटले जात असले तरी हल्ली विविध कारणांमुळे शेती हा आतबट्टय़ाचा व्यवसाय ठरू लागला आहे. औद्योगिकीकरणामुळे शेती कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. बिगर शेतीच्या कामांवर मजुरांना अधिक मजुरी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चढय़ा दराने मजुरी देऊन शेतीची कामे करावी लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. मजुरांअभावी लागवडीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. अशा रीतीने ‘इकडे आड तिकडे विहीर’ या कोंडीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी शेत जमीन नापिकी अवस्थेत ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कारण शेतीसाठी मोठय़ा रकमेची औजारे खरेदी करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा बचत गटांमार्फत शेतकऱ्यांना शेतीची औजारे उपलब्ध करून दिली आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा कृषिअधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोड यांच्याशी केलेली बातचीत..
* महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. ठाणे जिल्ह्य़ातही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. येथील शेती उत्पादनावर त्याचा कितपत परिणाम होईल?
यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल २१ टक्के अधिक पाऊस पडला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा ६८ टक्के कमी पावसाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये त्याहीपेक्षा कमी म्हणजे ४३ टक्के पावसाची नोंद झाली. मुबलक पाणीसाठा होण्यासाठी हा पाऊस अपुरा असला तरी त्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होईल, असे वाटत नाही. भात लावणीनंतर मध्ये बराच काळ पाऊस नव्हता. त्यामुळे काही टक्के उत्पन्न मात्र कमी येईल.
* जिल्हा प्रशासनाने राबविलेला यांत्रिक शेतीचा प्रयोग कितपत यशस्वी झाला ?
ठाणे जिल्ह्य़ातील बहुतेक शेतकरी अल्प तसेच अत्यल्प भूधारक आहेत. त्याला शेतीसाठी यंत्रे विकत घेणे परवडत नाही. पुन्हा परंपरागत मजूर लावून शेती करणेही आता व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे. शेती व्यवसायातील हे दुष्टचक्र भेदायचे असेल तर प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर शेतीची अवजारे देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
* बचत गटांमार्फत ही यंत्रे देण्याचे कारण काय?
ठाणे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ३ हजार ६४९ इतके बचत गट आहेत. ४८ हजार ९०६ कुटुंबांमध्ये बचत गटांचे जाळे पसरले आहे. चिखलणी, मळणी, लावणी आदी कामे बहुतेक करून महिला करतात. यंत्र उपलब्ध करून दिल्याने त्यांचे शारीरिक श्रम कमी होतील. यंत्रांच्या वापरामुळे मजुरांवर होणारा खर्च वाचेल. औजारांच्या भाडय़ातून बचत गटांना उत्पन्न मिळेल. थोडक्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल, अशा पद्धतीने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील शेती व्यवसायात सहकाराचे तत्त्व रुजावे, हाही हेतू यामागे आहे.
* कोणकोणती यंत्रे देण्यात आली आहेत?
बचत गटांच्या मागणीनुसार छोटा ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, भात रोवणी यंत्र, भात मळणी यंत्र, भात कापणी यंत्र, डिझेल पंप संच, पेट्रोल स्टार्ट डिझेल रन पंप, नॅपसॅक स्प्रे, रॉकिंग स्प्रे पंप, पॉवर स्प्रे कम डस्टर, दातेरी विळे, प्लास्टिक क्रेटस् आदी उपलब्ध करून दिली जात आहेत.
* योजनेचे नेमके स्वरूप काय आहे?
चालू आर्थिक वर्षांसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ ही योजना आहे. नोंदणीकृत बचत गटांना जास्तीत जास्त पाच लाख रुपये मदत दिली जाते. एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. आतापर्यंत ३० महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
’झपाटय़ाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात शेतीचे भवितव्य काय ?
नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शेती व्यवसाय मागे पडत असला, तरी लगेचच तो संपुष्टात येण्याची अजिबात शक्यता नाही. ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड, शहापूर या दोन तालुक्यांतील बहुतेक कुटुंबे अजूनही पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. कल्याण, भिवंडी तसेच अंबरनाथ तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते. येथील पारंपरिक शेतीला शास्त्रशुद्ध नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. पावसाळ्यानंतर कडधान्ये तसेच भाजीपाला लागवडीतून आता अनेक शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू लागले आहेत. कारण गावांशेजारील शहरी भागातच त्यासाठी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. गावातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतरही त्यामुळे कमी होऊ शकेल. गेली काही वर्षे प्रशासनाच्या वतीने ठाण्यात तांदूळ महोत्सव भरविण्यात येतो. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ग्रामीण भागातील शेतकरी थेट त्यांचा तांदूळ या बाजारात ग्राहकांना विकतो. ग्राहक आणि शेतकरी असा थेट व्यवहार दोघांनाही फायदेशीर ठरू लागला आहे.