जागोजागी बेकायदा बांधकामे, निमुळते रस्ते, पाण्याचा तुटवडा, झोपडय़ांचा विळखा यामुळे काल-परवापर्यंत मंदीच्या गर्तेत सापडलेल्या कळवा-मुंब््रयाच्या बांधकाम क्षेत्राला सध्या खारेगाव, पारसिकनगर आणि शीळ-डायघरने तेजीचा हात दिला आहे. मनीषानगर आणि सह्य़ाद्री वसाहतीमधील रहिवासी वस्तींपुरते काल-परवापर्यंत कळव्याचे बांधकाम क्षेत्र ओळखले जात असे. बेकायदा वसाहती आणि धोकादायक इमारतींचा या उपनगराला अक्षरश: विळखा पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे. खारेगाव पट्टय़ात अधिकृत वसाहती उभ्या राहू लागल्याने घरांच्या शोधात येथे मध्यमवर्गीय चाकरमान्यांची वस्ती वाढू लागली आहे. खारेगावपल्याड पारसिकनगर भागात मोठय़ा बिल्डरांच्या मोठय़ा वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. ठाण्यापासून घोडबंदर गाठण्यासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. ओवळा गाठण्यासाठी यापेक्षा अधिक काळ लागतो. कळव्याच्या पारसिकनगरची वस्ती ठाणे स्थानकापासून इतक्याच अंतरावर आहे. त्यामुळे खारेगाव-पारसिकनगर पट्टय़ाने घोडबंदरला आव्हान उभे करण्यास सुरुवात केले आहे. नातू परांजपे, वाधवा, मॅरेथॉन ग्रुपसारखे मोठे बिल्डर या ठिकाणी वसाहती उभ्या करू लागल्या आहेत. मुंब््रयापल्याड शीळ भागात दोस्ती ग्रुपने मोठय़ा वसाहतीची पायाभरणी केली आहे. कल्याण-शीळ पट्टा मुंबईतील बडय़ा विकासकांना आकर्षित करू लागला आहे. त्यामुळे ठाण्याच्या पलीकडे कळवा-मुंब्रा-शीळ परिसर आता बांधकाम व्यावसायिकांचे नवे ठाणे ठरू लागला आहे.नियोजित विकासाचा अभाव हे कळवा-मुंब््रयाचे जुने दुखणे ठरू लागले आहे. नियोजन आणि बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून वाट्टेल तशा उभारलेल्या इमारतीमुळे या संपूर्ण भागाची रयाच गेली आहे. नवी मुंबईसारख्या नियोजित नगराला खेटून असलेल्या विटाव्याचाही पार विचका झालेला. अशा परिस्थितीत खारेगाव पट्टय़ातील मोकळ्या जागा मोठय़ा बिल्डरांना भुरळ पाडू लागल्या आहेत. खारेगाव, पारसिकनगर पट्टय़ातील बडय़ा वसाहतींमधील घरांचे दर प्रति चौरस फुटाला १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ठाण्यातील एका जुन्या प्रथितयश विकासकाने नुकतेच या भागात एक मोठी वसाहतीची उभारणी सुरू केली आहे. तेथील घरांचे दर प्रति चौरस फुटास ११ हजार रुपयांइतके ठेवण्यात आले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्यालगत एका मोठय़ा बिल्डरची विशेष नागरी वसाहत उभी राहत आहे. तेथील घरांचे दर आतापासूनच १० हजार रुपयांच्या घरात आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिकेने कळवा-खारेगाव, मुंब्रा परिसरातील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष पुरविले आहे. राज्य सरकारने काही मोठे प्रकल्प या ठिकाणी येऊ घातले आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणानेही या भागाकडे लक्ष पुरविले आहे. याचा फायदा येथील बांधकाम क्षेत्राला मिळू लागला आहे. कल्याण-शीळ पट्टय़ातील २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे वर्ग झाल्याने दिवा-डायघर-शीळ पट्टय़ातील बांधकाम क्षेत्राला मंदीच्या हंगामातही झळाळी आली आहे. एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेला या पट्टय़ातील घरांचे दर प्रति चौरस फुटाला पाच हजार रुपयांचा टप्पा गाठू लागला आहे. तुलनेने स्वस्त घरांच्या शोधात ग्राहकांनाही हा परिसर आकर्षित करू लागला आहे.