ठाणे जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत वाढ
दिवाळ सणाचा मुहूर्त साधत गेल्या तीन दिवसात ठाणे आणि कल्याण परिक्षेत्रात सुमारे तीन हजारांहून अधिक नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. कल्याण परिसरात जेमतेम १५० वाहने खरेदी झाली असली ठाण्यात मात्र हे प्रमाण बरेच मोठे आहे. यामध्ये दुचाकी वाहनांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. वाहनखरेदी करणाऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असले तरी ठाण्याच्या रस्ते वाहतुकीची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागाला मात्र वाहनांच्या वाढत्या संख्येची धास्ती वाटू लागली आहे.
यंदा जिल्ह्यात दिवाळी सणानिमित्ताने सुमारे तीन हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली, अशी माहिती ठाणे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या क्षेत्रात ठाणे, कळवा-मुंब्रा, भिवंडी तसेच मिरा-भाईंदर ही शहरे येतात. या विभागाकडे दिवाळी निमित्ताने सुमारे तीन हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली असून त्यामध्ये ७१२ कार तर २२८० मोटारसायकलींचा समावेश आहे. तसेच कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाच्या क्षेत्रात कल्याण शहरासोबतच मुरबाड, शहापूर आदी ग्रामीण भाग येतात. या विभागाकडेही गेल्या तीन दिवसात केवळ १५९ वाहनांची नोंदणी झाली असून त्यामध्ये १३० मोटारसायकल, २६ कार आणि तीन ट्रॉन्सपोर्ट वाहनांचा समावेश आहे.
कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाचा आकडा कमी असला तरी, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेल्या वाहनांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट होण्याची भीती ठाणे वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या शहरी भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहनाच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. त्या तुलनेत रस्ते अपुरे पडत असल्याने शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटील होत आहे. याशिवाय, शहरांच्या विस्तारीकरण होत असातानाच वाहन तळांची पुरेशी सुविधा निर्माण करण्यात महापालिका अपयशी ठरल्या आहेत. परिणामी, शहरातील रस्त्यांवर वाहने उभी रहात असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.