आरोपांनी व्यथित ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे राजकारण्यांना आवाहन

‘ठाणे शहराच्या विकासासाठी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबालाही वेळ दिला नाही. इतके प्रेम या शहरावर केले, पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप आणि टीका होऊ लागली आहे. त्यामुळे मला आता इथे राहण्याची इच्छा नाही,’ अशा शब्दांत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी आपली व्यथा मांडली. शासन माझी बदली करत नसेल तर माझ्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवा. जेणेकरून माझी बदली होईल व मी आपला आभारी राहीन, असे सांगत जयस्वाल यांनी मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय सदस्यांना आवाहन केले.

ठाणे महापालिकेचा पदभार स्वीकारल्यापासून धडाक्यात कामे सुरू करणारे जयस्वाल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जात असले तरी, ठाण्यातील भाजप नेत्यांनी जयस्वाल यांच्याविरोधात अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आयुक्तांवर पक्षपातीपणाचे आरोपही करण्यात आले. या आरोपांना जयस्वाल यांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत उत्तर दिले. ‘ठाणे शहरासाठी काही तरी करावे, या उद्देशातून नेहमीच काम केले आहे. काही ठिकाणी अपयशीही झालो असेल, हे मान्य करतो. असे असतानाही काही महिन्यांपूर्वी माझ्याविरोधात एक घाणेरडे प्रकरण पुढे आले. त्याच वेळी मी आणि माझ्या कुटुंबाने या शहरातून बदली करून घ्यायची असा निर्णय घेतला होता,’ असे ते म्हणाले. ‘आजपासूनच सुट्टीवर जाणार होतो. परंतु सोमवारी दिवसभरात अशी काही घटना घडली आहे की, ज्यामुळे मला सुट्टीवर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. त्या घटनांबाबत मी उघडपणे फारसे बोलणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले. शासनाने एक ते दोन महिन्यांत माझी बदली केली नाही तर आपण सुट्टीवर जाऊ, असेही त्यांनी सांगितले.

‘निर्णय सर्वसाधारण सभेचेच’

ठाणे महापालिका स्थायी समिती गठित झालेली नसल्यामुळे या समितीचे सर्व प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केले जातात. या प्रस्तावांवर सर्वसाधारण सभा निर्णय घेते आणि त्यांची अंमलबजावणी प्रशासन करते, असे सांगत प्रशासनावर होणाऱ्या आरोपांचे आयुक्त जयस्वाल यांनी खंडन केले. तसेच हुकूमशाही किंवा मनमानी पद्धतीने काम करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून आपल्यावर वैयक्तिक स्वरूपात टीका केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

काल-परवापर्यंत मी ज्यांच्या नजरेत हिरो होतो, त्यांनाच आता झिरो वाटू लागलोय. माझ्या कामाचे मूल्यमापन ठाणेकर जनतेने मनात करून ठेवले आहे.

– संजीव जयस्वाल, ठाणे मनपा आयुक्त.