ठाणे महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर विकासकामांचे प्रस्ताव

ठाणे महापालिका आयुक्त आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षांमुळे रखडलेली पालिकेच्या स्थायी समितीची बैठक अखेर आज, शनिवारी पार पडणार आहे. या बैठकीच्या विषय पटलावर विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाच्या पडताळणीत योग्य आढळलेल्या निविदांचे प्रस्ताव आयत्या वेळी मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही समजते.

ठाणे महापालिकेच्या गेल्या काही महिन्यांतील सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून या सर्व प्रस्तावांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश प्रस्तावांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यात केवळ ठेकेदार निश्चित करण्याच्या प्रस्तावांना मान्यता ९देण्याची प्रक्रिया शिल्लक आहे.अशा प्रस्तावांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता   लागण्यापूर्वी स्थायी समितीची मान्यता मिळवून देऊन त्यांची उद्घाटने उरकण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा बेत होता; परंतु महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षांमुळे स्थायी समितीची बैठकच लांबणीवर पडत होती.

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रशासनाने शनिवारी स्थायी समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या विषय पटलावर विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रातील खोदलेले रस्त्यांचे चर भरणे, क्रीडा संकुलांची खासगीकरणातून साफसफाई करणे, उद्यान आणि रस्ता दुभाजकांची दोन वर्षे निगा आणि देखभाल करणे आणि दिवा रेल्वे रुळावर उड्डाणपुलाची उभारणी करणे यासह विविध प्रस्तावांचा समावेश आहे.

आयत्या वेळेस मंजुरी

शनिवारी आयोजित केलेल्या स्थायी समिती बैठकीच्या विषयपत्रिकेमध्ये प्रशासनाने रोखून धरलेल्या मंजूर विकासकामांच्या निविदांचे प्रस्ताव मंजुरीसाठी अद्याप ठेवण्यात आलेले नाही. असे असले तरी त्यापैकी बहुतांश प्रस्ताव आयत्या वेळेस मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. ठेकेदारांनी संगनमत करून काही निविदा भरल्याच्या संशयावरून निविदांच्या फायलींची पडताळणी सुरू होती. २८ फेब्रुवारीपर्यंत ही पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सर्वच विभागांनी ही पडताळणी पूर्ण केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीतील पटलावरील विषयांनतंर हे प्रस्ताव आयत्या वेळेस मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिवा येथे उड्डाणपूल

दिवा रेल्वे रुळावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे आग्रही होते, मात्र आयुक्त आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षांमुळे लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या कामाचे उद्घाटन होणार नाही, अशी चिन्हे होती; परंतु प्रशासनाने हा प्रस्ताव शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर आणला असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.