गर्दीच्या ठिकाणी दीड मिनिटात खाद्यपदार्थ पुरवणारी केंद्रे उभारणार ; ५० वॉटर व्हेण्डिंग मशीन्स
शहराची स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य अशा प्राथमिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने आता ठाणेकरांच्या खाण्यापिण्याची सोयही करून देण्याचे ठरवले आहे. नागरिकांना चांगल्या प्रतीचे आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूर्स कॉपरेरेशन’च्या (आयआरसीटीसी) माध्यमातून शहरातील गजबजलेल्या भागांत खाद्य केंद्रे सुरू करणार आहे. या ठिकाणी नागरिकांना अवघ्या दीड मिनिटात तयार पदार्थाचे ‘बॉक्स’ पुरवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांमध्ये पाणी पुरवणाऱ्या ‘वॉटर व्हेण्डिंग मशीन्स’च्या धर्तीवर शहरातील ५० ठिकाणी अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ‘आयआरसीटीसी’ने यासंदर्भात पालिकेकडे प्रस्ताव मांडला आहे.
ठाण्यात मोठमोठी उपाहारगृहे आहेत. मात्र घाईगडबडीच्या वेळेत भूक भागवण्यासाठी ठाणेकरांचा मोर्चा रस्त्यांवरील स्टॉलकडेच वळतो. अनेक स्टॉलवर आरोग्य आणि स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याने अशा पदार्थाच्या सेवनाचा नागरिकांना धोका संभवतो. या पाश्र्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या खाद्यकेंद्रांतून ठाणेकरांना देशभरातील नामांकित कंपन्यांकडून निर्मिले जाणारे तयार खाद्यपदार्थ दीड मिनिटात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभारण्याचा विचार पालिकेने चालवला आहे. ‘आयआरसीटीसी’चे समूह महाप्रबंधक अरविंद मालखेडे, गृहविभागाचे विशेष कार्य अधिकारी मालेगावकर यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी संजीव जयस्वाल यांनी यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेस सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब हे उपस्थित होते.
यासोबतच शहरातील विविध भागांत एकूण ५० ठिकाणी अशी वॉटर व्हेण्डिंग मशीन्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे सॅटिस, रुग्णालये, क्रीडा संकुले, नाटय़गृह या गर्दीच्या ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनविण्यात आलेल्या या मशीन्समध्ये ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम, थंड पाण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. या मशीनच्या माध्यमातून ३०० मिली पाणी १ रुपयात तर कंटेनरसह २ रुपयामध्ये मिळणार आहे. अर्धा लिटरची पाण्याची बाटली ३ रुपयांमध्ये तर कंटेनरसह ५ रुपये, १ लिटरची बाटली ५ रुपये तर कंटेनरसह ८ रुपये, २ लिटरची बाटली ८ रुपये तर कंटेनरसह १२ रुपये, ५ लिटर पाणी २० रुपये तर कंटेनरसह २५ रुपये या किमतीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘फूडबॉक्स’ची योजना
* चेन्नईमध्ये कार्यरत असलेली ‘अतच्यम’ या कंपनीच्या ‘फूडबॉक्स’ या संकल्पनेच्या माध्यमातून अन्नपदार्थ क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या पॅक केलेले अन्नपदार्थाचा या फूडबॉक्स या केंद्रावर पुरवतील.
* या केंद्रावर अन्नपदार्थाची यादी, ते अन्नपदार्थ कोणत्या कंपनीचे आहेत त्याचे नाव व त्याची किंमत लावलेली असणार आहे. नागरिक आपल्याला हवे असलेले अन्न कुपन्सच्या साहाय्याने लगेचच म्हणजे केवळ दीड मिनिटामध्ये मिळू शकतात.
* या फूडबॉक्ससाठी १०० चौरस फूट जागा आसन व्यवस्थारहित तर आसनव्यवस्थेसह किमान ७०० ते १००० चौरस फुटांची जागा लागणार आहे.
* या केंद्रामध्ये किमान ८ तास अन्नपदार्थ ताजे ठेवता येऊ शकतात.