ठाणे : ठाणे शहराच्या वेशीवर भिवंडीच्या दिशेने नवे ठाणे निर्मितीची  काही वर्षांपूर्वी  केलेली घोषणा कागदावर राहिली असताना ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या पलीकडे उल्हास नदीच्या किनारी भिवंडी तालुक्यात पुन्हा एकदा नवे ठाणे शहर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

भिवंडी तालुक्यातील पाच गावांचा विशेष नगर नियोजनातून विकास करण्याचा विचार असून यासाठी कासारवडवली ते खारबाव असा नवा खाडीपूल उभारण्याचा प्रस्तावही महापालिकेने तयार केला आहे.

ठाणे शहरापाठोपाठ कळवा-मुंब्रा भागाचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. तसेच एकेकाळी शेत जमिनी आणि जंगल परिसर असलेल्या घोडबंदर भागाचाही मोठय़ा प्रमाणात विकास झाला आहे. या ठिकाणी टोलेजंग इमारतींबरोबरच महापालिकेचे मोठे प्रकल्पही उभे राहिले आहेत. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने याच भागात मेट्रो प्रकल्पाची आखणी केली आहे. ठाणे, कळवा, दिवा परिसराचे एकीकडे वेगाने नागरीकरण सुरु असताना महापालिका प्रशासनाने कासारवडवली खाडी पल्ल्याड आणि उल्हास नदीच्या जवळ असलेल्या पायगाव, शिलोत्तर, पाये, मालोडी, नागले आणि खारबाव या भागात ‘नवे ठाणे’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी तालुक्यातील ही पाच गावे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. प्राधिकरणाच्या विकास आराखडय़ामध्ये पायगाव, शिलोत्तर आणि खारबाव भागातून वसई, अलीबाग मल्डीमोडल कॉरिडोर दर्शविण्यात आला आहे. त्याचबरोबर खारबाव येथून घोडबंदरला जोड रस्ताही दर्शविण्यात आला असून या रस्त्यामुळे ही गावे ठाणे शहराला जोडली जाणार आहेत. मुंबई विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखडय़ात खारबाव पट्टयात विकास केंद्र उभारणीचा प्रस्तावही आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने एमएमआरडीएच्या मदतीने या संपूर्ण पट्टयात नियोजीत शहर उभारण्याची तयारी शासनाकडे दाखवली असून यासाठी आवश्यक असलेल्या खाडी पुलाच्या उभारणीसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्तावही महापालिकेने तयार केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मदतीने पाचही गावांचा विकास करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. मात्र, त्याबाबत दोन्ही विभागांची संयुक्त नेमणूक करणेबाबत शासनाला कळवावे लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडीतील खारबाव भागात गेल्या काही वर्षांपासून बेकायदा इमारती उभारण्यात येत असून त्यामध्ये स्वस्त घरे मिळत असल्याने नागरिकही अशा घरांची खरेदी करत आहेत. मात्र, खारबाव तसेच आसपासच्या परिसरात नवे ठाणे विकसित करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत प्रस्तावही तयार केला आहे. या प्रस्तावानुसार महापालिका आणि एमएमआरडीच्या माध्यमातून याठिकाणी घरे तयार झाली तर बेकायदा बांधकामांना आळा बसून नागरिकांनाही अधिकृत घरे मिळतील. तसेच ही सर्व गावे कासारवडवली-खारबाव पुलामुळे घोडबंदर आणि ठाणे शहराला जोडली जाणार असल्यामुळे येथील जमिनींचा भाव वाढण्याची चिन्हे आहेत.

होणार काय?

कासारवडवली खाडी पलीकडे म्हणजेच उल्हास नदीजवळील भिवंडी तालुक्यातील पायगाव, शिलोत्तर, पाये, मालोडी, नागले आणि खारबाव या भागात ‘नवीन ठाणे’ विकसित करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मदतीने नियोजनबद्ध असे नवे शहर वसविण्याची योजना महापालिकेने आखली आहे.