महामार्ग, पुलांवरील खड्डे भरण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा; एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळाची मात्र डोळेझाक

ठाणे : राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि उड्डाणपुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिका करत असलेला पाठपुरावा अपयशी ठरत आहे. या दोन्ही विभागांचे अधिपत्य असलेल्या खात्यांचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेतच; पण त्यासोबत ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेचे सुकाणूही त्यांच्याच हाती आहे. असे असतानाही या तिन्ही यंत्रणांचा ताळमेळ नसल्याने ठाणे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर घोडबंदर परिसरातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. हे दोन्ही महामार्ग उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, भिवंडी, नाशिक भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. या मार्गावरील नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा, पातलीपाडा, वाघबीळ भागातील उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत. याशिवाय, ओवळा भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमधून वाट काढताना ठाणेकर हैराण झाले आहेत. या खड्डय़ांमुळे जीवघेणा अपघात होण्याची भीतीही आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातून हे दोन्ही रस्ते जात असले तरी ते राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करणे महापालिकेला शक्य नाही. करोनाच्या पहिल्या टप्प्यापासूनच महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. रस्त्यांवर वाहनांची पुरेशी वर्दळ नसतानाही दुरुस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत.

या संदर्भात महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत शहरातील महामार्ग आणि उड्डाणपूल येत असून या दोन्ही विभागांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी एप्रिल महिन्यात पहिले पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा पत्रव्यवहार केला आहे. या दोन्ही विभागांकडून पाऊस थांबताच खड्डे बुजविण्यात येतील असे सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच या दोन्ही विभागांचे संचलन करणाऱ्या खात्यांचे मंत्रिपद आहे. असे असताना ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षित राहिल्याबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी होत आहे.

ठाणे शहरातील महामार्ग आणि उड्डाण पुलावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यापैकी कापुरबावडी, पातलीपाडा भागातील खड्डे नुकतेच बुजविले असून उर्वरित भागातील खड्डेही लवकरच बुजविण्यात येतील. सकाळच्या वेळेत वाहतूक सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येते. त्यात पाऊस सुरू झाला तर खड्डे बुजविण्याच्या कामात अडचण निर्माण होते, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अभियंत्याने दिली. तर येत्या दोन दिवसांत पाऊस थांबताच आमच्या अखत्यारीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे ‘एमएमआरडीए’च्या एका अभियंत्याने सांगितले.