ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या टोलनाक्यांवरील वेगवान प्रवासात अडसर निर्माण होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आखलेल्या वेगवेगळ्या नियमांची टोलनाक्यांकडून सर्रास पायमल्ली होत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

विनाअडथळा प्रवासासाठी आखण्यात आलेली ‘फास्ट टॅग’ योजना, ईटीसी मार्गिकांची आखणी तसेच पिवळ्या पट्टीचा नियम या सर्वाची टोलनाक्यांवर नीट अंमलबजावणी होत नसल्याने कोंडी वाढत असून सरकारी यंत्रणेचेही दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर टोल व्यवस्थापनाने मध्यंतरी काही ठिकाणी पिवळ्या पट्टय़ा मारल्या होत्या. मात्र, आता हा नियमच अस्तित्वात नसल्याचा दावा व्यवस्थापनाकडून केला जात आहे.

केंद्र सरकारने १ जानेवारी २०१८ रोजी ‘फास्ट टॅग’ योजना सुरू केली. नवे वाहन खरेदी करताना ग्राहकाकडून या स्टिकरसाठी सहाशे रुपये घेतले जातात. त्याशिवाय, प्रादेशिक परिवहन विभाग वाहनांची नोंदणी करीत नाही. या स्टिकरच्या माध्यमातून पथकर नाक्यावर वाहनाची नोंद होते आणि त्या वाहनचालकाच्या बँक खात्यातून टोल व्यवस्थापनाच्या खात्यात रक्कम वळती होते. त्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांना थांबावे लागत नाही. या योजनेसाठी रेडिओ फ्रिकव्हेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. टोलनाक्यावरील प्रवास कोंडीमुक्त व्हावा आणि येथील आर्थिक कारभारात पारदर्शकता यावी, या उद्देशातून ही योजना बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई तसेच ठाणे आणि नवी मुंबई शहरांच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर अशा प्रकारची योजनाच कार्यान्वित नसल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे या योजनेसाठी पैसे भरणाऱ्या चालकांनाही पथकर नाक्यावरील वाहनांच्या रांगेत उभे राहावे लागत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील  कोंडी सोडविण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी पिवळ्या पट्टीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टोलनाक्यांवरील पिवळ्या पट्टय़ांच्या पुढे रांगा गेल्यास वाहनांना विनाटोल सोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यासाठी टोलनाक्यांवर पिवळ्या पट्टय़ा मारण्यात आल्या होत्या. मात्र, सुरुवातीपासूनच या आदेशाचे पालन करण्यात टोलवाटोलवी सुरू होती.

आता तर आनंदनगर टोलनाक्यावरील पिवळ्या पट्टय़ाच गायब झाल्याचे दिसून येते. तर ऐरोली टोलनाक्यावरील पिवळ्या पट्टय़ा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टोलनाक्यांवर पिवळ्या पट्टय़ांच्या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसते. तसेच ईटीसी योजनासाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका आहेत. मात्र या मार्गिकांमध्ये ईटीसी स्टिकर नसलेली वाहने सर्रास शिरत असून त्यांना रोखण्यासाठी टोल नाक्यांवर यंत्रणाच नाही. या योजनेसाठी वाशीत मार्गिका असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे दर महिन्याला पास काढून प्रवास सुलभ होईल, या आशेवर असलेल्या वाहनचालकांनाही टोलनाक्यांवरील रांगेत उभे रहावे लागत आहे.

ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या शहराच्या वेशीवरील पाचही टोलनाक्यांवर ईटीसी योजना राबविली जाते. ‘फास्ट टॅग’ आणि ईटीसी या दोन्ही एकच योजना असल्यामुळे त्याची टोलनाक्यांवर अंमलबजावणी होत आहे. मात्र  पिवळ्या पट्टीसंबंधीचा कोणताही निर्णय आम्हाला प्राप्त झालेला नाही. मात्र, चार मिनिटांपेक्षा जास्तवेळ वाहतूक थांबून राहिली तर मार्गिका वाढवून त्यावरून वाहने सोडण्याचा नियम आहे. त्याचे टोलनाक्यांवर पालन केले जाते.

 – जयंत म्हैसकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमईपी