करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळवा, मुंब्रा आणि दिवा या तिन्ही भागांतील मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळातील रस्त्यांवर दुचाकी, रिक्षा, कार आणि प्रवासी वाहनांना वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रविवारी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार सायंकाळपासूनच सुरू करण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने, शासकीय-निमशासकीय वाहने, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची खासगी वाहने, वैद्यकीय सेवेतील वाहने, प्रसारमाध्यमे, पोलीस, होमगार्ड, आयात-निर्यात करणारी अवजड वाहने, ऑनकॉल रिक्षा यांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा निर्णय लागू राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून घरी राहण्याच्या सूचना देऊनही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. मुंब्रा आणि कळवा परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आला असून दाटीवाटीच्या परिसरात हे रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. असे असतानाही कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील काही नागरिक विनाकारण वाहने रस्त्यावर घेऊन फिरत असल्याची बाब पुढे आली असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आता या तिन्ही भागातील मुख्य आणि गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार सायंकाळी ६ वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. भाजीपाला, अन्नधान्य, किराणा माल, दूध, फळ, चिकन, मटण, औषधे यासह जीवनावश्यक वस्तूची वाहतूक तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. त्याचप्रमाणे कारखाने, गोदामे आणि बंदरावरून होणाऱ्या आयात-निर्यात प्रक्रियेतील अवजड वाहने, प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिलेल्या ऑनकॉल रिक्षा यांसह अन्य अत्यावश्यक सेवातील वाहनांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही, असे असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले.