डोंबिवली पश्चिमेतील काही रिक्षाचालक विष्णुनगर रेल्वे व स्वच्छतागृहाजवळील प्रवेशद्वार अडवून प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी बुधवार दामदुपटीने दंड आकारून, प्रसंगी त्यांचा परवाना काही महिन्यांसाठी निलंबित करण्याचा विचार सुरू आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी सांगितले.
सकाळी आठ वाजल्यापासून या भागातील फुले चौक, दीनदयाळ चौक, गांधी चौकात वाहतूक नियोजन करणारे वाहतूक पोलीस भोजनासाठी निघून जाताच काही बेशिस्त रिक्षाचालकांची दादागिरी सुरू होती. सगळ्या रिक्षाचालकांना दुपापर्यंत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या रिक्षा जप्त करून त्या वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. बहुतांशी रिक्षाचालक गणेशनगर, गरिबाचापाडा, नवापाडा भागात प्रवासी वाहतूक करणारे आहेत.

संबंधित रिक्षाचालकांवर दामदुप्पट दंड आकारण्यात येईल आणि त्यांनी पुन्हा असा गुन्हा केला तर त्याचा परवाना काही महिन्यांसाठी निलंबित करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येतील.
– दिलीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली पश्चिम