समाजमाध्यमांवरून नागरिकांची मोहीम, सेलेब्रिटींचाही सहभाग

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसरेवा येथील जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीकामामुळे गेल्या काही महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर सकाळ आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ठाणे महापालिका निवडणूक प्रचाराचा हंगाम तेजीत असताना दररोज कोंडीत सापडणाऱ्या घोडबंदरवासीयांकडून यासंबंधीच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी समाजमाध्यमांवरून ‘कोंडीमुक्त घोडबंदर’ मोहीम छेडण्यात आली आहे. या मोहिमेत परिसरात राहणाऱ्या नामवंतांनीही सहभाग नोंदवल्याने ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात हा मुद्दा तापू लागला आहे.

मुंबई, ठाणे, वसई या शहरांसह गुजरात राज्याला जोडणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलास तडे गेल्याने दोन वर्षांपूर्वी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाची डागडुजी करून सहा महिन्यानंतर तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. असे असतानाच ऑगस्ट महिन्यात या पुलाला पुन्हा तडे गेल्याचे उघड झाल्याने या पुलावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

या प्रश्नावर स्थानिक प्रशासन तसेच राजकीय मंडळींनी मौन धारण केल्यामुळे आता घोडबंदर परिसरातील नागरिकच यासाठी समाजमाध्यमांवर उतरले आहेत. घोडबंदरमधील वाहतूक कोंडीच्या मुद्दय़ावरून मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनीही समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टनंतर अनेकांनी याबद्दलची आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली आहे. मांडलेकर यांच्या पोस्टमध्ये थेट राजकारण्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.

अडीच तासांचा प्रवास

  • वसरेवा पूल वाहतुकीस बंद करण्यात आल्यामुळे वाहतूक नियोजनासाठी काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई, मीरारोड, घोडबंदर आणि वसई या भागातून येणारी वाहतूक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन चौकात अर्धा तास रोखून धरण्यात येते. त्यामुळे वाहनांच्या रांगा गायमुखापर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत एखादे अवजड वाहन बंद पडल्यास कोंडीत भर पडते.
  • घोडबंदर भागातून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मुंबईतील पश्चिम भागात जायचे असेल तर त्यांना पवईमार्गे वळसा घालून जावे लागते.
  • घोडबंदर मार्गावरून ठाणे, नवी मुंबई आाणि मुंबई परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसफेऱ्या सुरू असतात. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय, अनेक जण खासगी वाहनांनी प्रवास करतात. ही वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने या नागरिकांचा प्रवास पाऊण तासाऐवजी आता दोन ते अडीच तासांचा झाला आहे.
  • शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई, वसई, दमण अशा भागांत फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या दोन्ही दिवशी या मार्गावर मोठी कोंडी होताना दिसून येते.

‘गेले सहा महिने घोडबंदर रोडवर अर्धा ते पाऊण तास, कधी कधी एक तास एका बाजूची वाहतूक थांबविली जाते. कारण आहे वर्सोवा खाडी पुलाची दुरुस्ती. हे आणखी किती काळ चालणार आहे, याची काही ही स्पष्टता नाही. आता मतांचा जोगवा मागायला याल, तेव्हा तरी आमची ही समस्या सोडवा. रोज तास तासभर का थांबायचे? आम्ही गाडय़ा बंद करून रस्त्यात?’

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची पोस्ट