ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाच लाख वृक्ष लागवड करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीपासून हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून यंदा शहरात महावृक्ष अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार शुक्रवारी दिवसभरात महापालिकेच्या दहा प्रभाग समिती क्षेत्रात ७० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील वन जमिनीवर लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांची निगा व देखभालीचे काम वन विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरामध्ये पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प गेल्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये केला होता. शहरातील पर्यावरणाचा समतोल राखता यावा म्हणून हा संकल्प सोडण्यात आला होता. या संकल्पानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीपासून शहरामध्ये वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली असून त्यामध्ये आतापर्यंत दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत यंदा शहरामध्ये महावृक्ष अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या अभियानाची सुरुवात शुक्रवारी मुंब्रा बायपास येथून करण्यात येणार आहे. या मोहिमेत शुक्रवारी दिवसभरात ७० हजार वृक्ष लागवड करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत देवरीपाडा ते डायघर या परिसरातील कौसा, शीळ आणि डायघर भागातील ३५० हेक्टर वन जमिनीमध्ये हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याची निगा व देखभाल वन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या दहा प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये एकाच वेळी ही वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महावृक्ष अभियान राबविण्यासाठी प्रभाग समित्यांच्या पातळीवर नियोजन आखण्यात येत आहे. समिती क्षेत्रातील कोणकोणत्या भागात वृक्षांची लागवड करायची, यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण केले असून त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.

स्वयंसेवी संस्थाचा सहभाग

या अभियानामध्ये स्काऊट गाइड, एनएसएस, अनिरुद्ध बापू ट्रस्ट, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, हरियाली, होप, फन, आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह एकूण २०पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.