‘‘आदिवासी विकासासाठी भरपूर निधी शासनाकडे आहे. मात्र त्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसाहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतिगृह इमारती तसेच भोजन कक्षाची राज्यपालांनी पाहणी केली.

‘‘आदिवासी समाजाच्या विकासाकरिता शासन विविध योजना राबवीत आहे. खासगी कंपन्यादेखील आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून या कामांना सहकार्य करण्यास तयार आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्वच प्रकल्पांना गती मिळणे आवश्यक असून ठाणे जिल्ह्य़ातील अपूर्ण प्रकल्पांना तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांची बैठक राजभवन येथे आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्ही शंकर यांनी पुढाकार घेऊन तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून ही शाळा बांधली आहे.