News Flash

पावलोपावली कोंडीचीच वळणे

आजवर अनेक औद्योगिक, रहिवासी संकुले या भागांत विकसित  झाली आहेत.

पावलोपावली कोंडीचीच वळणे
(संग्रहित छायाचित्र)

निधीची कमतरता, भूसंपादन, अतिक्रमण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

कल्याण, शहाड, विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथमधील वाहनांना बदलापूर आणि पुढे कर्जत गाठण्यासाठी तसेच बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वाहनांना कल्याण आणि पुढे भिवंडीकडे जाण्यासाठी कल्याण-बदलापूर अर्थात केबी रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र निधीची कमतरता, भूसंपादन, अतिक्रमण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि संबंधित विभागातील असमन्वय यामुळे कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे.

आजवर अनेक औद्योगिक, रहिवासी संकुले या भागांत विकसित  झाली आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या आणि गर्दी येथे वाढली आहे. सध्या ६० फुटांचा अपूर्णावस्थेत असलेला हा रस्ता वाहन संख्येच्या तुलनेत अरुंद पडू लागला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुरू असलेली संकुले पूर्ण झाल्यानंतर येथे मोठय़ा प्रमाणावर वाहने वाढणार आहेत. त्यामुळे कोंडीत भरच पडण्याची शक्यता आहे. या कामासाठी दुसऱ्यांदा  निविदा जाहीर झाली असून तिची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाला किती काळ लागतो हे गुलदस्त्यात आहे.

भौगोलिक रचना

कल्याण ते बदलापूर या मार्गाच्या शेजारी एका बाजूला काटई-कर्जत महामार्ग तर दुसऱ्या दिशेला कल्याण-नगर महामार्ग आहे. या रस्त्याच्या १४ किलोमीटरच्या अंतरात उल्हासनगरात शेकडो दुकाने, बाजार, अंबरनाथमध्ये औद्योगिक कंपन्या, नव्याने उभी राहत असलेली औद्योगिक वसाहत आणि रहिवासी संकुले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तहसील, पालिका, पोलीस स्थानक, मनोरंजनाची केंद्रे आहेत. अंबरनाथमधून जाणाऱ्या या रस्त्याच्या मोठय़ा भागाला फेरीवाले, गॅरेज आणि बेकायदा दुकानांचा विळखा आहे.

कोंडीची कारणे

* अंबरनाथ शहरात विविध कंपन्यांमध्ये कामाला येत असतात. तसेच अंबरनाथमधील महत्त्वाच्या शाळा, पोलीस ठाणे, एकमेव चित्रपटगृह, सीएनजी पंप,  शासकीय कार्यालये या मार्गावर असल्याने रोज अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात.

* कल्याण, उल्हासनगर, शहाड, भिवंडी, आणि आग्रा महामार्ग गाठण्यासाठी बदलापूर आणि अंबरनाथच्या वाहनचालकांसाठी हाच मार्ग फायद्याचा ठरतो.

* औद्योगिक वसाहतीतील अनेक वाहने कल्याण, भिवंडी आणि मुरबाड या भागात या मार्गावरून जातात.

लोकसंख्या

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहरांत लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक ते तीन हा परिसर मार्गालगत आहेत तर अंबरनाथ शहराचा पश्चिम भाग या रस्त्यालगत आहे. त्यामुळे जवळपास सहा ते सात लाख लोकसंख्या या रस्त्याच्या आसपास आहे.

कोंडी का?

* अतिक्रमणांचा अडथळा : सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र असंख्य अडचणींमुळे रस्त्याचे काम अनेक प्रकारे रखडले. यात रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे सर्वाधिक अडचणींचा विषय ठरला. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात यामुळे मोठा काळ काम थांबवण्यात आले.

*  सेवा रस्त्याची कमतरता : या रस्त्यावर अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने या ठिकाणी सेवा रस्ते असणे आवश्यक होते. यापूर्वीचा रस्ता अरुंद असला तरी त्यास सेवा रस्ते होते. मात्र आता ते नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

*  उल्हासनगर व अंबरनाथमध्ये एकही उड्डाणपूल नियोजित केलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील बहुतांश गर्दीच्या भागात कोंडी होत असते. सर्वच चौकांमध्ये ही कोंडी असते.

*  अंबरनाथ : उल्हासनगरच्या वेशीवर अनेक औद्योगिक संकुले उभी राहत आहेत. त्यात रहिवासी संकुलांचाही समावेश आहे. चिखलोली भागात रेल्वे स्थानकाच्या आशेने अनेक गृहसंकुले उभी राहिली आहेत. तर काटई-कर्जत महामार्गाला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर येत्या काळात मोठय़ा संख्येने वाहनांची भर पडणार आहे.

पर्यायी नियोजन

रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ते पूर्ण झाल्यास कोंडी कमी होण्याची आशा आहे. नव्याने आलेल्या निविदेत अनेक गोष्टींचा समावेश असल्याने त्याचा परिणाम कोंडी सोडविण्यावर होणार आहे. रस्त्यावर सिग्नल यंत्रणा, सेवा रस्ता, दुभाजकामुळे कोंडी टाळता येऊ  शकते.

वाहतूक कोंडीची ठिकाणे

* उल्हासनगर : कल्याणच्या दिशेचे प्रवेशद्वार, सतरा सेक्शन, शिवाजी चौक, फॉरवर्ड लाइन, राधास्वामी सत्संग आश्रम.

*  उल्हासनगर ते साईबाबा मंदिर  अंतर – ३.१ किलोमीटर

*  अंबरनाथ : मटका चौक, तहसील कार्यालयासमोर, पालिका मुख्यालय, अंबरनाथ पोलीस ठाणे, विमको नाका, लादी नाका, फॉरेस्ट नाका.

* अंबरनाथ तहसील कार्यालय ते फॉरेस्ट नाका – अंतर ३.५ किलोमीटर

सध्या ४२ कोटींची नवी निविदा जाहीर झाली असून लवकरच त्याचे कार्यादेशही दिले जातील. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध दुभाजक, सेवा रस्ता, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल.

-डॉ बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:21 am

Web Title: turn around traffic in street
Next Stories
1 सोनसाखळी चोरांना चाप
2 गणेशोत्सवात रस्ते प्रवास निर्विघ्न?
3 शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम
Just Now!
X