भयमुक्त प्रवासासाठी पोलिसांचा पुढाकार
ठाणे शहरातील महिलांचा प्रवास भयमुक्त तसेच अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून प्रीपेड रिक्षा योजनेपाठोपाठ महिला रिक्षाचालकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या शहरामध्ये पाच महिला रिक्षाचालक कार्यरत आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांत सुमारे ५३ महिलांनी रिक्षा चालविण्याचे परवाने काढले आहेत. मात्र या महिला रिक्षाचालकांना प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळू शकलेली नाही. मात्र, परवान्याच्या आधारे एक वर्षांच्या कालावधीनंतर त्यांना प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकतो. ठाणे शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींसोबत चालकाने गैरवर्तन केल्याच्या दोन घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या असून त्यापैकी एका घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली होती. या पाश्र्वभूमीवर महिलांसह सर्वच प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या दृष्टिकोनातून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात प्रीपेड रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता खास महिलांसाठी महिला रिक्षाचालक असलेल्या रिक्षांची वाहतूक वाढवण्याचा विचार सुरू आहे.ठाणे शहरात आजच्या घडीला जेमतेम पाच महिला रिक्षाचालक कार्यरत आहेत, तर गेल्या दोन महिन्यांत सुमारे ५३ महिलांनी रिक्षा चालविण्याचे परवाने काढले आहेत. मात्र हे परवाने प्रवासी वाहतूक विरहित आहेत. त्यामुळे या महिला रिक्षा चालवू शकतात, पण प्रवासी वाहतूक करू शकत नाहीत. या परवान्यावर एक वर्ष रिक्षा चालविण्याचा अनुभव असेल तरच प्रवासी वाहतूक परवाना देण्यात येतो. त्यामुळे या महिलांना आता मिळालेल्या परवान्याच्या आधारे पुढील वर्षांत प्रवासी वाहतूक परवाना मिळू शकतो. ‘भविष्यात महिलांना रिक्षा परवाने देण्यात यावेत, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे,’ अशी माहिती ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. असे असले तरी ज्या महिलांकडे रिक्षा प्रवासी वाहतूक परवाना आणि बॅच आहे, त्या महिलांना दुसऱ्याच्या रिक्षा परवान्यावर शहरात रिक्षा चालवू शकतात, अशी मान्यता परिवहन प्राधिकरणाने दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांनी रिक्षा चालविण्याचा परवाना काढल्यानंतर त्यांना एक वर्षांनंतर प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळतो. मात्र ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे महिलांसाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
 – अनामिका भालेराव, रिक्षाचालक
रिक्षा चालविणे हे पुरुषप्रधान क्षेत्र असल्याने महिलांसाठी ते फारच आव्हानात्मक आहे. रिक्षा चालविणाऱ्या महिलांना अनेक अडचणी येतात. परंतु या क्षेत्रात महिलांची संख्या वाढली तर सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागेल आणि पुरुषांची मक्तेदारी कमी होईल.
कविता बनसोडे, रिक्षाचालक