जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा या राष्ट्रीय महामार्गासाठी बदलापूरलगत असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा पाठविल्या असून यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाला विरोध करत आंदोलनाचा इशारा देणारे पत्र उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयास पाठविण्यात आले आहे.

जेएनपीटी ते वडोदरा महामार्गासाठी अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीची गरज लागणार आहे. यात मोठय़ा प्रमाणावर सुपीक जमिनीचे संपादन केले जाणार असल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. इतर अनेक प्रकल्पांच्या कामांसाठी यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासाठी जमिनीचे संपादन केले गेल्यास स्थानिक शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी अंबरनाथ तालुक्यातील जवळपास २०५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याने त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांना नोटिसी धाडण्यात आल्या आहेत. मात्र जमिनीच्या संपादनासाठी जमिनीवर टाकण्यात आलेला फेरफार हा स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेऊ न टाकण्यात आलेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बदलापूर शहराजवळील ढोके दापिवली गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पास कडाडून विरोध केला आहे.

वडोदरा ते जेएनपीटी या सहा पदरी मार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील दीड हजारांहून अधिक शेतकरी भूमिहीन होणार आहेत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होत असतील तर त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी उपविभागीय महसूल कार्यालयास पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. ही मागणी डावलून महामार्गासाठी जमीन संपादित केली जाणार असेल तर वेळ पडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.