|| किशोर कोकणे

मानवी चुकांमुळे तपासणीत त्रुटी राहात असल्याने निर्णय

ठाणे : आठ आणि पंधरा वर्षे जुन्या कार, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर चालविण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी मानवी पद्धतीने करण्यात येते. मात्र, या तपासणीमध्ये नजर चुकीने काही त्रुटी राहत असल्यामुळे वाहनांचे अपघात होऊन त्यात नागरिकांना जीव गमावावा लागण्याची भिती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवरठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने आता संगणकीय यंत्रणेद्वारे या वाहनांची योग्यता तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून येत्या सहा महिन्यात हि यंत्रणा कार्यन्वित केली जाणार आहे.

व्यावसायिक वापर होत असलेल्या कार, रिक्षा आणि टेम्पो या वाहनांची आठ वर्षांनंतर तर खासगी कार आणि रिक्षांची पंधरा वर्षांनंतर वाहन योग्यता तपासणी केली जाते. तसेच व्यावसायिक वापर होत असलेल्या कार, रिक्षा आणि टेम्पो या वाहनांना आठ वर्षांनंतर आणि त्यापुढे प्रत्येक दोन वर्षांनी योग्यता तपासणी करून घ्यावी लागते. या वाहनांची योग्यता तपासणी मानवी पद्धतीने करण्यात येते. काही वेळेस नजर चुकीने तपासणीमध्ये त्रुटी राहून जातात तर काही वेळेस दलालांकडून अशा तपासण्यांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याची ओरड सातत्याने होते. या पार्श्वभूमीवरठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने आता संगणकीय यंत्रणेद्वारे या वाहनांची योग्यता तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने ठोस पाऊले उचलली असून येत्या सहा महिन्यात हि यंत्रणा कार्यन्वित केली जाणार आहे.

हलक्या वाहनांना दिलासा

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये कार, रिक्षा आणि टेम्पो अशी दररोज सुमारे ३० हलकी वाहने योग्यता तपासणी येतात. या तपासणीसाठी वाहन चालकांना कल्याण येथील नांदिवली परिसरात जावे लागते. याठिकाणी अवजड तसेच हलक्या वाहनांची योग्यता तपासणी केली जाते. मात्र, नव्या संगणकीय यंत्रणेमुळे हलक्या वाहनांना आता कल्याणमध्ये जावे लागणार नसून त्यांची तपासणी ठाणे कार्यालय परिसरातच होणार आहे. त्यामुळे कल्याण येथे केवळ अवजड वाहनांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

तपासणी प्रक्रिया अशी..

संगणकीय यंत्रणेद्वारे वाहनाची योग्यता तपासणी करण्यासाठी एक केंद्र उभारले जाणार आहे. त्याठिकाणी वाहन तपासणीसाठी उभे करावे लागणार असून येथे संगणकाशी जोडण्यात आलेल्या तारांद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांमध्ये काही बिघाड असेल आणि ते रस्त्यावर चालविण्यास योग्य नसेल तर त्याची माहिती लगेच मिळणार आहे. तसेच या यंत्रणेद्वारे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

संगणकीय वाहन योग्यता तपासणी केंद्रासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला निधी मंजूर झाला असून येत्या सहा महिन्यांमध्ये हे केंद्र उभारण्यात येईल. ही पूर्ण यंत्रणा संगणकीय असल्याने वाहनाची योग्यता अगदी अचूकपणे तपासली जाणार आहे.

-नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे