जुना पूल दुरुस्तीसाठी बंद केल्याचा परिणाम; प्रवाशांची मोठी गैरसोय

विरार रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांचा भार आता नव्या पुलाला सहन करावा लागत आहे. नव्या पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना गाडी पकडण्यास विलंब होत आहे, तसेच धक्काबुकीचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

विरार स्थानकात सध्या दोन पादचारी पूल आहेत. जुना पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी एकमेव नव्या पुलाचा वापर करत आहेत. विरार हे महत्त्वाचे स्थानक आहे. तेथे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होती. जुना पूल बंद झाल्याने सर्व भार हा नव्या पुलावर येत आहे. त्यामुळे पूल पार करण्यासाठी खूप वेळ लागतो. या वेळी होणाऱ्या गर्दीचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. धक्काबुक्की ही नित्याची बाब झाली आहे. काही जणांनी या गर्दीत पाकीटमारी आणि मोबाइलचोरी झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत, तर महिलांनी धक्काबुक्की आणि छेडछाड होत असल्याचे सांगितले आहे. या गर्दीमुळे जेष्ठ नागरिकांना, लहान बालकांना तसेच स्त्रियांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेने तिसरा नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र या पुलाचे काम रखडलेले आहे. स्थानकाच्या बाहेर फेरीवाले आणि रिक्षांचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशी पुलाचा वापर करतात, परंतु नवीन पुलाचे रखडलेले काम आणि एक पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.