|| विजय राऊत

तब्बल तीन किलोमीटरवरील विहिरीतून पाणीपुरवठा

तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेल्या पोशेरा या मोखाडा तालुक्यातील गावाच्या ग्रामस्थांना दुषित पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थ गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणतात. मात्र या विहिरीचे पाणीही दुषित झाले असून या पाण्यावाचून ग्रामस्थांकडे कोणताही पर्याय नाही. या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने पालघर जिल्ह्याला दुष्काळाची झळ बसली आहे. मोखाडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आताच पाणीटंचाई भासू लागली आहे. पोशेरा गावासाठी तर पाणीपुरवठय़ाची कोणतीही योजना नाही. गावापासून तब्बल तीन किलोमीटर असलेली एक विहीर हेच या गावचे जलस्रोत. गावातील महिला आणि बालके तीन किलोमीटरवरून चालत जाऊन पाणी आणतात. मात्र यंदा या विहिरीतील पाणी दुषित झाले आहे. मात्र कोणताही पर्याय नसल्याने ग्रामस्थांना हेच पाणी प्यावे लागत आहेत. या पाण्यामुळे ग्रॅस्ट्रो आणि हिवताप आदी आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहेत.

या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले.

काही दिवसांपासून दुष्काळी झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहे. येत्या काही दिवसांत हे प्रस्ताव मंजूर होऊन लवकरच संबंधित गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.    – बी. एम. केतकर, तहसीलदार, मोखाडा

यंदा पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. तब्बल तीन किलोमीटर जाऊन विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. पण या विहिरीचे पाणी दूषित असून ते पिल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.     – योगेश चौधरी, नागरिक