जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद

शहाड येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरूअसल्याने बुधवारी सकाळी डोंबिवली शहराला पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शहरात मंगळवारी पाणी नसते. त्यात बुधवारीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची पंचाईत झाली.

कल्याण डोंबिवली महापालिका उल्हास नदीतून पाणी उचलते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने मंगळवारी डोंबिवलीत पाणीकपात केली जाते.

मंगळवारी पाणीपुरवठा बंद असल्याने महापालिकेने शहाड येथील १४०० एमएम व्यासाच्या जलवाहिनी हलविण्याचे काम हाती घेतले होते; मात्र हे काम मंगळवारी पूर्ण झाले नाही. बुधवारीही काम सुरूच असल्याने पालिकेला शहरात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. दुपारी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो कमी दाबाने असल्याने अनेकांना पाणी आले नाही. त्यामुळे मंगळवारबरोबरच अनेक नागरिकांचा बुधवारही कोरडाच गेला.

काही सोसायटय़ांनी तातडीने टॅंेकरची मागणी केली. मात्र टँकर येण्यासाठीही त्यांना तीन ते चार तासांची वाट पहावी लागल्याने त्यांना कामाला दांडी मारण्यावाचून पर्याय नसल्याचे चिंतन गगे यांनी सांगितले.

दुपारी पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असला तरी तो कमी दाबाने असल्याने अनेकांना पाणी आलेच नाही. त्यामुळे मंगळवार बरोबरच अनेक नागरिकांचा बुधवारही कोरडाच गेला.

शहाड येथे रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून या कामात जलवाहिनीचा अडथळा येत होता. त्यामुळे येथील जलवाहिनी हलविण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले होते; परंतु हे काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने बुधवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा करता आला नाही; मात्र दुपारच्या सत्रात पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

 – अनिरुद्ध सराफ, पालिका उपअभियंता