tvlogवीज हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण एकेकाळी वीज नव्हती, तेव्हा जीवनमान कसे चालत असेल, याचा विचार कधी केला आहे. आज ठाणे शहर रात्री विजेच्या झगमगाटाने उजळून निघते. पण एकेकाळी शहरातील काही भागातच विजेने प्रवेश केला होता. ठाणे शहरात १९२७मध्ये विजेने प्रवेश केला. पण १९५५-५६पर्यंत बहुसंख्य ठाणेकरांकडे वीज नव्हती. केवळ धनाढय़ लोकांच्या घरीच वीज खेळत होती. पुढे बऱ्याच घरात पेट्रोमॅक्सचे दिवे आले. आता तर ठाणे शहरातील अंधार नष्ट होऊन जागोजाग प्रकाशित झाला आहे.

आज रेडिओ, टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर, पंखे, एसी, स्वयंपाकघरातील विजेची उपकरणे आणि झगमगाटी दिव्यांची आपल्याला एवढी सवय झालेली असते की, वीज गेल्यावर सर्व ठप्प होऊन आपला जीव कासावीस होऊ लागतो. मग चौकशी, फोनाफोनी सुरू होते. आधी सोसायटीच्या सेक्रेटरीला, मग वायरमनला, सरतेशेवटी घायकुतीला येऊन एम.एस.ई.बी.ला. इतके आपण वीज आणि विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या अधीन झालो आहोत. मग जेव्हा ठाण्यात वीजच आली नव्हती, तेव्हा ठाणेकरांचे जीवन कसे असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
१९२७ साली विजेने ठाण्यात प्रवेश केला. त्यानंतर ठाणे नगरपालिकेने १९२८ साली रस्त्यावर दिवे लावण्यास प्रारंभ केल्यावर ठाण्यातील सधन लोकांच्या घरी वीज खेळू लागली, तीही ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील सुखवस्तू वस्तीत. ठाणे स्टेशनजवळच्या नाईकवाडीतील वसंतराव ऊर्फ बापू नाईक यांच्या घरात १९४४ साली वीज आली तेव्हा त्यांच्या शेजारी नौपाडा गावात ग्रामपंचायत होती. तेव्हा नौपाडा भागात दाट झाडी होती आणि माणसांची वस्तीही फारच तुरळक होती. तिथली माणसे गावात जाऊन येतो, असे सांगत. गावात म्हणजे जांभळी नाक्यावरील बाजारपेठेत जाऊन वाणसामान, कापड-चोपड असा बाजारहाट करून येत. गावात वीज नसल्यामुळे संध्याकाळी सातच्या नंतर नौपाडा, हरिनिवास, घंटाळी भागांत सर्वत्र चिडीचूप होऊन जाई. १९५८ साली कोपरी, नौपाडा इत्यादी भाग ठाणे नगरपालिकेत समाविष्ट झाल्यावर तेथे विजेने प्रवेश केला. तोपर्यंत गावातील रस्त्यांवर म्युनिसिपालटीने लाकडाच्या खांबांवर घासलेटवर जळणारे काचेचे दिवे लावले होते. नौपाडा तसेच खोपटच्या गावदेवीपासून वाडिया मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिवे पेटविण्यासाठी म्युनिसिपालटीने कामगार तैनात केले होते. हे दिवे रात्रभर जळत राहिले पाहिजेत, असा दंडक होता.
१९५५-६० पर्यंत बहुसंख्य ठाणेकरांकडे वीज नव्हती. तिन्ही सांजा झाल्या, की समईच्या मंद प्रकाशात देवघर उजळून निघे. स्वयंपाकघरात चुलीजवळ ढणढणता घासलेटचा दिवा, बाहेरच्या खोलीत ओगळे कंपनीची काच लावलेली व मागे प्रकाश परावर्तित करणारी चकचकीत गोलाकार पत्र्याची चकती असलेला दिवा किंवा काचेची बारीक चिमणी आणि कंदील यांच्या प्रकाशात रात्री आठपर्यंत जेवणे झाली, की सगळीकडे चिडीचूप व्हायचे. तेव्हा प्रत्येकाच्या घरासमोर अथवा परसदारासमोर अंगण असे. अंगणाभोवती कडू मेंदीचे कुंपण, गुलाब, जास्वंदी, तर काहींच्या दारात पारिजात, तगर, मखमल, झेंडू इत्यादी फुलझाडे हमखास असत. वीज नाही म्हटल्यावर पंखे कुठून असणार. निसर्गक्रमाने मग झोपेची जागाही बदले. पावसाळ्यात घरात, हिवाळ्यात ओसरीवर, तर उन्हाळ्यात अंगणात काही जण झोपत आणि उन्हाळा सुसह्य़ करीत. त्या काळात देवी, कांजण्यांची साथ येत असे. अशा वेळी देवीचा कोप होऊ नये किंवा तिला शांत करण्यासाठी ज्या घरात देवी आली असेल तेथे जागरणाचा कार्यक्रम होत असे. ज्यांच्याकडे थोडा पैसा असे असे लोक भाडय़ाने पेट्रोमॅक्सचे दिवे आणीत. त्या प्रकाशात मग ‘सात-पाच बाया मिळुनी आल्या। हातावर कांटा कांटा हा खेळवती।’.. अशी बायांची गाणी व भजने उत्तरोत्तर रंगत जात. त्यात गाण्यांच्या सुरेल चालींवर ढोलकी-टाळांचा दूरवरून येणारा लयीतला आवाज कानाला अतिशय गोड वाटे. ते ऐकता ऐकताच गाढ झोप लागे. तेव्हा कोणाकडे विशेष कार्यक्रम असला म्हणजे लग्न, बारसे आणि गौरी-गणपतीच्या सणाला असे पेट्रोमॅक्स दिवे लावले जात. पाहुण्यांच्या लगबगीपेक्षा गॅसबत्तीचा तो पांढराशुभ्र लख्ख प्रकाश पाहताना लहानपणी त्याचे खूप अप्रूप वाटे.
१९५४ साली खोपटचे घर सोडून आम्ही कोलबाडमध्ये राहायला आलो. कोलबाडमध्ये बहुसंख्य वस्ती ही ख्रिश्चनांची होती. त्यांच्या मोठय़ा कौलारू व माडीवजा घरातून विजेचे दिवे झळाळताना दिसत आणि घरातून गोवानीज संगीताचा साज ल्यायलेली कोंकणी गाणी किंवा हिंदी गाण्यांचा आवाज ऐकू येई. येथे माझे पाय थबकत, पण घरात डोकावण्याची हिंमत होत नसे. हळूहळू चार्ली, डॅलूक, मिल्टन, परेरा या मुलांशी सलगी जमली. परेरा यांचे टांगे होते. मागच्या बाजूला घोडय़ांची पागा आणि बदके व डुकरांचे खुराडे होते. परेराचे घर एकमजली आणि मोठे ऐसपैस होते. घरात पाऊल टाकताच माझे लक्ष वेधले ते कोपऱ्यातील कलाकुसर केलेल्या शिसम लाकडाच्या टेबलावर ठेवलेल्या ग्रामोफोनने- हिज मास्टर व्हॉइसने- आणि पुढे चावी दिल्यावर फिरणाऱ्या तबकडीच्या बाजूला लावलेल्या कण्र्यातून गाणे कसे ऐकू येते, या अचंब्याने ‘आ’ वासून ग्रामोफोनच्या तबकडीवर चिकटवलेल्या चित्रातल्या श्वानाप्रमाणे माझे कानही टवकारले गेले. कोलबाडमध्ये मराठी माणसांची घरे हाताच्या बोटांपेक्षाही कमी होती. त्यापैकी निवाते आणि कोलबाडमधले जमीनदार कोलुंगडे यांची घरे मोठी प्रशस्त होती. कोलुंगडे यांच्या घरात विजेवर चालणारा पंखा आणि टेबलावर लाकडी कॅबिनेटचा मोठा रेडिओ होता. प्रथमच अगदी जवळून रेडिओ पाहत होतो. तेव्हा बालसुलभ अनेक प्रश्न पडायचे. त्यापैकीच या रेडिओत माणसे जाऊन कसे काय बोलतात बुवा, हा प्रश्न रेडिओची सवय होईपर्यंत कायम होता. कोलुंगडे यांच्या घरातील मुकुंदकाका हे इलेक्ट्रिशियन होते. वायरिंगचे काम, दिवाळीत रंगीबेरंगी दिव्यांची माळ, पंखा व रेडिओ दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. एक दिवस हाताच्या पंज्यात मावेल अशी कसली तरी मशीन घेऊन आले. दिवसभर बऱ्याच खटपटीनंतर त्या मशीनमधून लाल-पिवळा दिवा पेटला आणि त्यातून संगीताचे सूर उमटले. आम्ही सात-आठ मुले कोंडाळे करूनच त्यांच्याभोवती उभे राहून तो चमत्कार पाहत होतो. जपानने मोठय़ा रेडिओचे रूपांतर लहानशा ट्रान्झिस्टरमध्ये केलेले होते. तो पहिला ट्रान्झिस्टर रेडिओ पाहायला बागेतील सर्व मंडळी, मुकुंदकाकांचे मित्र, कोलबाडमधले त्यांचे काही ख्रिश्चन दोस्तही तो चिमुकला रेडिओ पाहून आश्चर्यचकित होत होते, पण नव्याची नवलाई चार दिवस टिकते तसे वर्ष-सहा महिन्यांतच बॅटरी सेलवर चालणारे ट्रान्झिस्टर बाजारात येऊ लागले. आता विजेशिवाय घरात रेडिओची करमणूक उपलब्ध झाली. दरम्यान, आम्ही पुन्हा खोपटच्या घरी राहायला आलो. आता घरात वीज आली होती.
खोपटला डांबरी सडक होऊ पाहत होती आणि रस्त्यावर विजेचे दिवे लावण्यात आले होते. खोपटचे त्या वेळचे नगरपिते आणि ठाण्याचे नगराध्यक्ष गणपत भोईर होते. ठाणे नगरपालिकेचे ते शतकोत्तर वर्ष (१९६३) असल्याने नवी उमेद घेऊन नागरी सुविधा, प्रकल्प, योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होऊ लागल्या. त्यापैकी औद्योगिक क्षेत्राने ठाण्यात क्रांती घडविली. यासाठी वीज हे महत्त्वाचे साधन होते. निरनिराळ्या उद्योगांमध्ये मर्फी कंपनीचे रेडिओ ऐकताना आश्चर्यचकित होऊन ओठांवर बोट ठेवलेले मर्फी बाळ ठाणेकरांच्या घराघरांत पोहोचले. आधुनिकतेकडे झेपावणाऱ्या ठाण्याचे चित्र मला मर्फी बाळाच्या डोळ्यांत दिसत होते, असे आता उगाचच वाटू लागले आहे.