दीड महीने काम रखडल्याने आता नवी अंतिम मुदत

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सुमारे दीड महिना रखडलेल्या ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून प्रकल्पासाठी लागणारे पोलाद आणि सिमेंटचा पुरवठा करणारी वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र दीड महिने काम रखडल्याने या प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नवी अंतिम मुदत असणार आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध व्हावी आणि लोकल गाडय़ांचा वेग वाढावा या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प २००९ मध्ये आखण्यात आला होता. सुमारे ९ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. मात्र विविध कारणांमुळे रेल्वेचा हा प्रकल्प दहा वर्षांहून अधिक काळ रखडला असून प्रकल्प रखडल्याने त्याचा खर्च ४०० कोटींहून अधिक झाला आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे ठेवण्यात आले होते. तब्बल दहा वर्षांनी या प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला होता. या ९ किलोमीटरच्या मार्गासाठी मुंब्रा खाडीवर उन्नत मार्ग उभारण्याचे कामही ७० टक्के पूर्ण झाले होते. मात्र करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे या प्रकल्पाचे काम दीड महिन्यांपासून रखडले होते. प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचण्यास मजुरांना आणि अभियंत्यांना येणाऱ्या अडचणी, सिमेंट आणि पोलादाच्या मालाची वाहतूक, अशा विविध कारणांमुळे हे काम थांबले होते. मात्र टाळेबंदीच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या मजुरांच्या साहाय्याने पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाचे विद्युतीकरणाचे काम सुरू झाले आहे. टाळेबंदीमुळे रूळ बसविणे, सिग्नल यंत्रणा बसविणे या कामांसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मजुरांची आणि निरीक्षकांची जमवाजमव सुरू झाली असून लवकरात लवकर हे कामही पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच टाळेबंदीमुळे रखडलेली पोलादाची आणि सिमेंटची वाहतूक सुरळीत करण्याचे आवाहनही अधिकारी आणि अभियंत्यांसमोर आहे. सुमारे दीड महिने काम रखडल्याने हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे शक्य नसून हे काम पूर्ण होण्यासाठी आता नवी अंतिम मुदत असणार आहे. आठवडाभर या कामाचा वेग पाहून नवी अंतिम मुदत ठरवणे शक्य होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

मुंब्य्रात करोना रोखण्याचे आव्हान

पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मुंब्रा येथे उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. मात्र मुंब्रा क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने ठाणे महापालिकेने या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. त्यामुळे या कामासाठी अभियंता आणि कामगारांना या भागात पोहोचणे शक्य होत नव्हते. तर करोना वाढल्याने या ठिकाणी कामावर येण्याबाबत अनेकांच्या मनात भीती होती. त्यामुळे हे काम थांबले होते. मात्र या परिसरात आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी या कामाच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती एमआरव्हीसीतर्फे देण्यात आली आहे.