१०६ वर्षांचा वाङ्मयीन आढावा; १०६ लेखांचा समावेश
सन १९०९ ते २०१४. मराठी वाङ्मयीन संस्कृतीला ललामभूत ठरलेल्या दिवाळी अंकांचा तब्बल १०६ वर्षांचा वाङ्मयीन इतिहास. त्याचा वेचक आढावा घेणारा एक विशेष दिवाळी अंक यंदा मराठी शारदेच्या दरबारात रुजू होत आहे.
दोन खंडांत प्रकाशित होत असलेल्या या ‘प्रतिभा’ दिवाळी अंकामध्ये निवडक १०६ लेखांचा समावेश असून आचार्य अत्रे, जी. ए. कुलकर्णी, ग. त्र्यं. माडखोलकर, दुर्गा भागवत, वि. दा. सावरकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. आ. बुवा, नरहर कुरुंदकर, श्री. पु. भागवत, रॉय किणीकर, राम शेवाळकर यांची लेखनसंपदा अंकातून वाचकांना भेटेल.
काशिनाथ मित्र यांनी १५ जानेवारी १८९६ मध्ये ‘मनोरंजन’ मासिक सुरू केले. नंतर परदेशातील एका मासिकापासून प्रेरणा घेऊन त्यांनी दिवाळीत तशा प्रकारचा अंक प्रसिद्ध करायचे ठरविले आणि त्यातून १९०९ मध्ये या वैशिष्टय़पूर्ण सांस्कृतिक परंपरेचा जन्म झाला. तेव्हापासून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या सुमारे दहा हजार दिवाळी अंकांतील सुमारे एक लाख कथा, लेख, कविता यांचा धांडोळा घेऊन त्यातून हे १०६ खास लेख निवडण्यात आले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वा. नेर्लेकर, रवींद्र गुर्जर, मिलिंद जोशी आदी साहित्यिकांनी ही निवड केली आहे. नीलेश गायकवाड हे या अंकाचे संपादक असून, ठाण्यातील व्यास क्रिएशन्स आणि बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठ यांच्यातर्फे येत्या गुरुवारी बदलापूर येथे प्रकाशित करण्यात येणार आहे.
अंतरंगात
१९५८च्या ‘नवभारत’ दिवाळी अंकातील प्रा. म. दा. साठे यांचा ‘भारतीय लिपीची कुळकथा’ या त्या काळच्या बहुचर्चित लेखाचा समावेश या दिवाळी अंकात आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’त १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘प्रिय पुंडरिका’ हा वि. स. खांडेकर यांचा लेख, १९६६च्या ‘ज्ञानदूत’मध्ये अ. का. प्रियोळकर यांनी लिहिलेला ‘चार शतकांमागचा गोमांतकातील हिंदू’, चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी १९८२च्या ‘रसिक’मध्ये लिहिलेला ‘फाशी’ हा लेख, १९६२ च्या ‘दीपावली’तील पु. ल. देशपांडे यांचा ‘माझे खाद्यजीवन’ असे लेख आहेत.