शहापूर  : तालुक्यातील भातसई भागात संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमधील १०९  विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. यामध्ये ४६ मुले आणि ६३ मुलींचा सामावेश आहे. बाधित विद्यार्थ्यांना शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते १० वी इयत्तेत २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आश्रमशाळा अनुदानित आहे. बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात पुलाव आणि गुलाबजाम हे अन्नपदार्थ देण्यात आले होते. हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर १०९ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना तातडीने शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी उपजिल्हारुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. दरम्यान, रुग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांचे कुटूंबिय आणि नातेवाईकांची गर्दी जमली होती. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा >>>ठाण्यात कंटेनर शाखांवरून शिवसेना-भाजपात जुंपली; बेकायदा कंटेनर शाखांवर भाजपकडून कारवाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी विकास प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असतानाही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गावा मध्ये असलेल्या एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाचे जेवण दिल्याची प्राथमिक चर्चा  रुग्णालयात सुरू होती. त्याची पुष्टी अद्याप कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने केलेली नाही. परंतु पुलाव आणि गुलाबजामचे जेवण बाहेरून आणण्यात आले होते, अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली. याच मुद्द्यावरून आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.