नवीन रुग्णांना रुग्णालयात जागा मिळेना

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेली १३ कोविड रुग्णालये तुडुंब भरली असून यामुळे नव्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दररोज मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने त्यांच्या उपचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज सरासरी शंभरहून अधिक होती. मात्र आता शहरात दररोज सरासरी तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत.  एकीकडे रुग्ण संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पालिका क्षेत्रातील १३ कोविड रुग्णालये तुडुंब भरली आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.  दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीची करोना चाचणी होकारात्मक आली. त्याबाबत तातडीने पालिकेला कळविले. दोन दिवस उलटूनही या रुग्णाला खासगी रुग्णालयातून नेण्यासाठी पालिकेतून कोणी आले नाही. अखेर एका ओळखीतून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करून घेण्याची हालचाल करण्यात आली.

पालिका नियंत्रित सर्व करोना रुग्णालये, तेथील खाटांची माहिती आणि तेथील संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. कोणत्या करोना रुग्णालयात किती खाटा भरल्यात, किती रिकाम्या आहेत याची माहिती समजण्यासाठी एक सॉफ्टवेअर  आकाराला येत आहे. या सॉफ्टवेअरची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या जी अडचण लोकांना येतेय ती कायमस्वरूपी दूर होईल.

– सुरेश कदम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

पालिका करोना रुग्णालय

१३ पालिका नियंत्रित एकूण रुग्णालये

५०२ खाटांची संख्या

१०१ आयसीयू खाटांची संख्या

४६ कृत्रिम प्राणवायू यंत्र

१२०० टाटा आमंत्रा विलगीकरणात खोल्या

शास्त्रीनगर रुग्णालयात फक्त दोन यंत्र