कल्याण – सहामही परीक्षेत कमी गुण मिळाले या विचाराने तणावग्रस्त १४ वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घराच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कल्याण पश्चिमेतील मध्यमवर्गिय उच्चभ्रूंच्या रौनक सिटीमध्ये ही घटना गुरुवारी घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्यात या मृत्यूप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती, अशी की कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीमध्ये काही महिन्यापूर्वी आत्महत्या केलेल्या मुलीचे कुटुंब राहण्यास आले होते. आई, आजी आणि बहिण असे हे चौकोनी कुटुंब होते. मृत पावलेली मुलगी ही उल्हासनगर येथील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती.

स्वताच्या अभ्यासात प्रगती होत नसल्याने ती तणावात होती. तसेच, दिवाळीपूर्वी झालेल्या सहामही परीक्षेचा निकाल लागला होता. त्यातही तिला कमी गुण मिळाले होते. शिक्षकांनी तिला नेहमीच अभ्यासात सुधारणा करण्याची सामंजस्याने सूचना केली होती. नियमित अभ्यास करूनही आपली शैक्षणिक प्रगती होत नाही आणि परीक्षेत कमी गुण मिळत असल्याने या मुलीची चिंता वाढली होती. आता झालेल्या परीक्षेतही कमी गुण मिळाल्याने ती अस्वस्थ झाली होती. मृत मुलीची मोठी बहिण आपल्या बहिणीचा सहामही निकाल पाहण्यासाठी शाळेत गेली होती. या मुलीची आई नोकरी करते.

अभ्यासात होत नसलेली प्रगती, परीक्षेत मिळणारे कमी गुण या सततच्या विचाराने अस्वस्थ झालेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. घरात आजी व्यतिरिक्त कोणीही नाही पाहून ही मुलगी घराच्या खिडकीत लोखंडी जाळीवर चढली. तिने कसलाही विचार न करता १९ व्या माळ्यावरून तळमजल्याला उडी मारली.

मुलगी जमिनीवर पडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील सुरक्षा रक्षक, इतर रहिवासी तिच्या मदतीसाठी धावून आले. ही मुलगी १९ व्या माळ्यावरून पडत असताना ती तळमजल्याला वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीवर पडली. तिला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने उपस्थितांनी जवळच्या रुग्णालयात नेले. पण तिला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. खडकपाडा पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. रौनक सिटी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे.