डोंबिवली– कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील शिवसेनेच्या महत्वाच्या पदावरील १५ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे वरिष्ठांना पाठविले. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे डोंबिवली शिवसेनेला खिंडार पडले आहे.

डोंबिवलीतील शिवसेनेचा महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मध्यवर्ति शिवसेना शाखेत उध्दव ठाकरे यांच्या सोबत लावलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी शिवसेना महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सोमवारी आक्रमक होऊन काढल्या. ही माहिती मिळताच शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखेते पोहचले. त्यावेळी त्यांना उपस्थित सेना पदाधिकारी, कार्यकत्यांनी शाखेत येण्यापासून रोखले. त्यावरून शिंदे समर्थक आणि उध्दव समर्थक गटात बाचाबाची झाली. ही माहिती शिंदे समर्थक नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांचे कार्यकर्ते संजय राऊत यांचा पुतळा दहन करून शाखेत आले. तत्पूर्वीच पोलिसांनी शाखेभोवती अडथळे उभे करून त्यांना रोखले. दोन्ही गटात होणारा अनुचित प्रकार टाळला.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली

शाखेतील शिंदे पिता पुत्रांच्या तसबिरी काढल्याने शिवसेनेतील शिंदे समर्थक कमालीचे नाराज होते. ज्या शाखेत निष्ठेने २५-३० वर्ष शाखेत शिवसैनिक म्हणून वावरलो त्याच शाखेत प्रवेश मिळत नसेल तर शिवसैनिक म्हणून घेण्यात काय अर्थ असा विचार करून शिंदे गटातील १५ सदस्यांनी मंगळवारी तडकाफडकी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे दिले. दोन वर्षापूर्वी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले कट्टर शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या राजीनामा नाट्यामुळे निष्ठावान, उध्दव ठाकरे समर्थक आणि नव्या उमेदीचे शिंदे समर्थक असे दोन उभे गट डोंबिवली शिवसेनेत पडले आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला डोंबिवलीत मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. मध्यवर्ति शाखेवरुन तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने पोलिसांनी शाखेचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे समजते. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणी पदाधिकारी, पोलीस तयार नाहीत.

राजीनामा देणारे पदाधिकारी

राजेश कदम-उपजिल्हाप्रमुख, सागर जेधे-विधानसभा संघटक, दीपक भोसले, राजेश मुणगेकर-उपशहर संघटक, प्रथमेश खरात, अनिश निकम, स्वप्निल वाणी, सागर इंगळे-उपविभागप्रमुख, क्षितिज  माळवदकर, विशाल टोपले, कौस्तुभ फडके, निखिल साळुंखे, करण कोतवाल, ओमकार कदम, महेश बुट्टे या शहर सचिव, उपशाखा प्रमुख, शाखा अधिकारी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.