शहापूर : हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या पर्ण वाटवट्या, माशीमार, धोबी, दलदली ससाणे, तीर चिमण्या या पक्ष्यांसह दुर्मिळ वन पिंगळा, काळा करकोचा, मलबारी कर्णा, बहिरी ससाणा, तुरेवाला सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक अशा १५८ पक्ष्यांची नोंद पक्षी निरीक्षणात झाली आहे. पक्षी निरीक्षण सप्ताहात तानसा अभयारण्यात गेल्यावर्षापेक्षा यंदा ३२ पक्ष्यांच्या प्रजाती अधिक आढळून आल्या आहेत.
पक्षी वैज्ञानिक डॉ. सलिम अली व वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पक्षी सप्ताहाची सुरुवात ५ नोव्हेंबरला सुरू करण्यात आली. वन्यजीव विभाग आणि पक्षी मित्रांनी शहापूर तालुक्यात केलेल्या पक्षी निरीक्षणात दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी दिसून आले आहेत. यामध्ये वन पिंगळा, काळा करकोचा, मलबारी कर्णा, बहिरी ससाणा, तुरेवाला सर्पगरुड, शिंगळा, तिसा, टूइया पोपट, फुलटोचा स्वार या दुर्मिळ पक्षांसह पर्ण वाटवट्या, माशीमार, धोबी, दलदली ससाणे, तीरचिमण्या तसेच हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या एकूण १५८ पक्षी नोंद झाली असून यंदा ३२ प्रजातींची अधिक नोंद झाली आहे. पान पक्ष्यांच्या प्रजातींचे अजून आगमन होत असून पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध प्रजातींसह भृंगराज, हळद्या, पोपट, घुबड, कोटवाल, बगळे, पानकावळे, कुटूर्गा, घार, पिवळ्या कंठाची चिमणी, पाकोळी, गरुड, तिसा आदी पक्ष्यांची नोंदही पक्षी निरीक्षणात झाली असल्याचे पक्ष्यांचे छायाचित्र टिपणारे पक्षीमित्र रोहिदास डगळे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत फटाके वाजविणाऱ्यावरून तरूणाला मारहाण
वन्यजीव विभाग आणि शहापुर वनविभाग यांच्या मार्गदर्शनानुसार आऊल कॉन्झरवेशन फाऊंडेशन यांनी पक्षी सप्ताहात योगेश शिद, अविनाश भगत, शाहीद शेख, शंतनू डे, प्रथमेश देसाई, भरत वाख, दामू धादवड, अक्षय गहरे, रोहिदास डगळे या पक्षी मित्रांनी पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला.
मलबारी कर्णा, काळा करकोचा, लांब चोचीची तीर चिमणी, पर्नवटवट्या, जंगली वटवट्या, ह्युम पर्नवटवट्या, राखी कोतवाल, माशीमार, मंगोलियान चंडोल, मलबारी चंडोल, दलदली ससाणा अशा ३२ प्रजाती आढळून आल्या.